सचिन बनसोडे
Ahmednagar News: अमित ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांचे नाराजी नाट्य बघायला मिळाले होते. अमित ठाकरे यांनी पुरेसा वेळ न दिल्याने राहाता येथील काही पदाधिकाऱ्यांनी उद्विग्न होत नामफलकाचा कव्हर फाडत राजीनामे देणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात आता मनसेच्या जिल्हा कार्यकारणीने पत्रकार परिषद घेत झालेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Latest Marathi News)
अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते बाभळेश्वर येथे मनसेच्या कार्यलयाचे उद्घाटन झाल्यानंतर राहाता येथे सत्कार आणि शिर्डीत (Shirdi) साई दर्शन असा २२ जुलै रोजीचा त्यांचा नियोजित दौरा होता. संबंधित नामफलकाच्या उद्घाटनाबद्दल त्यांना कल्पना देणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने अमित ठाकरे केवळ सत्कार घेऊन राहात्यातून शिर्डीकडे रवाना झाले.
गैरसमजातून उद्विग्न होत काही कार्यकर्त्यांनी केवळ फलकावरील कव्हर फाडून आपल्या भावना व्यक्त केल्या. अमित ठाकरे यांची या सर्व प्रकरणात काहीही चूक नाही असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष राजेश लूटे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
नामफलकाचे उद्घाटन नियोजित नव्हते तर ते काही कार्यकर्त्यांनी ऐनवेळी ठरवले होते. मात्र जिल्हा कार्यकारणीत समन्वयाच्या अभावाने आम्ही अमित ठाकरेंपर्यंत संदेश पोहचवू शकलो नाही. गैरसमजातून आम्ही नामफलकावरील कव्हर फाडला हे मान्य करतो.
राज्यात चुकीचा संदेश गेल्याने त्या प्रकरणानंतर जिल्हा कार्यकारणीने बैठक घेऊन आमचे गैरसमज दूर केले. आम्ही पूर्वीही मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते होतो आणि भविष्यातही अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचेच काम करणार असल्याचे नाराजी व्यक्त करणाऱ्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.