सुशिल थोरात
Latest Ahmednagar News : तुम्ही घरीच थांबा फक्त ॲडमिशन पाथर्डी तालुक्यात घ्या आणि ज्यावेळी वार्षिक पेपर असतील त्या वेळीच परीक्षा द्यायला या. तुम्हाला पास करण्याची आमची हमी, तुम्हाला लागेल ती सर्व मदत परीक्षेत करू कॉपी पुरवण्यासाठी मदत करू असे आमिष दाखवून वीस ते सत्तर हजारापर्यंत विद्यार्थ्यांकडून एजंट लोकांनी पैसे उकळण्याचा प्रकार घडला आहे.
आम्हाला कॉपी करता न आल्याने आम्ही या विषयात नापास होणार असल्याने आमचे पैसे परत द्या अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू असा पवित्रा घेत मंगळवारी वीस ते पंचवीस इयत्ता बारावीचे परजिल्ह्यातील विद्यार्थी पालकांसह पोलीस स्टेशनला आले.
त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच संबंधित शैक्षणिक संस्थाचालकाने पालकांची विनवणी करत गुन्हा दाखल करू नका, तुमचे सर्व विद्यार्थी पास होतील व येथून पुढे कोणतीही अडचण येणार नाही अशी विद्यार्थ्यांची समजूत घातल्या नंतर गुन्हा दाखल न करताच दोन तास पोलीस (police) स्टेशनला थांबलेले हे विद्यार्थी व पालक परत गेले.
मंगळवारपासून बारावी बोर्डाची परीक्षा (HSC Exam) सुरु झाली आहे. या परीक्षेमध्ये ज्या एजंट लोकांनी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सांगितले त्या पद्धतीने पेपरमध्ये कॉप्या करता आल्या नाही म्हणून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित एजंटला मारहाण केली.
इयत्ता १२ वीला तुम्हाला चांगल्या गुणांनी नक्की पास करुन देऊ असे आश्वासन तालुक्यातील काही संस्थाचालक देत असल्याने राज्यातील अनेक शहरातील विद्यार्थ्यांनी आश्वासन देणाऱ्या या संस्थेमध्ये दरवर्षी प्रमाणे प्रवेश घेतल्याने जवळपास अडीच हजार विद्यार्थी तालुक्यात १२ वीची परीक्षा देण्यासाठी आले होते.
काल इंग्रजी विषयाचा पेपर होता. तालुक्यातील एका गावच्या शैक्षणीक संस्थेने काही विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेत प्रवेश देत पास करून देण्याची हमी देत विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये जमा केले. ज्या परीक्षा केंद्रावर या विद्यार्थ्यांची परीक्षा होती त्यासह अनेक केंद्रावर सामूहिक कॉपी होऊ नये यासाठी प्रशासनाने मोठी दक्षता घेतल्याने पैसे मोजूनही या विद्यार्थ्यांना कॉपीच करता न आल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संपताच ज्या शिक्षकाकडे पैसे दिले होते त्याला धक्कबुक्की करत पोलीस स्टेशनला आणले.
या सर्व प्रकरणाची माहिती संबंधित शिक्षणसंस्थेच्या प्रमुखाला कळताच त्यांनी गुन्हा दाखल करणाऱ्या एका पालकाला फोन करत तुम्ही असे काही करू नका. कोणत्याच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली आहे. उद्या असा प्रकार घडणार नाही अशी समजूत काढल्या नंतर गुन्हा दाखल न करताच पालक व विद्यार्थी माघारी फिरले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.