बीड: आजपर्यंत आपण अनेक कोविड सेंटर (Covid Centre) पाहिले असतील, जे शासनाने दिलेल्या निधीवर आणि जेवणाच्या बिलावर चालवले जात आहेत. मात्र आज आम्ही आपल्याला, शासनाच्या निधी किंवा जेवणाचं बिल एकही रुपया न घेता, स्वखर्चातून 4 महिन्यांपासून चालवलं जात असणारं कोविड सेंटर दाखवणार आहोत. विशेष म्हणजे कोणताही राजकीय वारसा नसताना किंवा एकही स्थानिक स्वराज्य संस्थाचं, राजकीय पक्षाचं पद नसताना, 26 वर्षीय तरुणाने हा सामाजिक सेवेचा विडा उचलला आहे. कसा आहे हे समाजातील लोकप्रतिनिधीनी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा असं कोविड सेंटर.
बीडच्या नेकनूर गावपरिसरात असणारं अन् गाव खेड्यातील नागरिकांचा आधार बनलंय हे कोव्हिडं सेंटर. 26 वर्षीय तरुण असणाऱ्या अरविंद जाधव यांच्या संकल्पनेतून, हे कोविड सेंटर गेल्या 4 महिन्यांपासून याठिकाणी सुरू आहे. कोरोना म्हटलं की, कुटुंबातील व्यक्ती देखील जवळ येण्यास धजावत असल्याचे चित्र आज निर्माण झालेलं आहे. मात्र आपल्या परिसरातील प्रत्येक माणसाचा जीव वाचला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, प्रत्येक रुग्णाचे मनोबल वाढविण्याचे काम, अरविंद जाधव हे करत आहेत. या कोव्हिडं सेंटरमध्ये, गाव व परिसरातील आतापर्यंत जवळपास 450 रुग्ण दाखल झाले होते.
या सर्वांना योग्य उपचार, मानसिक आधार, प्रोटीनयुक्त सकस आहार देत, एकही मृत्यू होऊन न देता, त्यांना ठणठणीत बरं करण्याचं काम अरविंद जाधव यांनी केलं आहे. विशेष म्हणजे शासनाचा एकही रुपयाचा निधी न घेता आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचे बिल न घेता, स्वखर्चातून चालणार जिल्ह्यातील एकमेव कोविड सेंटर आहे. त्यामुळे गावखेड्यातील नागरिकांसह शासनाला देखील या कोविड सेंटरचा आधार मिळाला आहे.
तर याविषयी कोव्हिडं सेंटर चालक अरविंद जाधव म्हणाले, की जेव्हा मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यावेळी मृत्यूदर बऱ्याच प्रमाणात वाढला होता, यामुळे या घाटावरील लोकं बीड जिल्हा रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करत होते. यामुळे या ठिकाणी सेंटर सुरू केलं. त्यानंतर या घाटावरील सर्वच रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झाले. या ठिकाणी सर्व सुविधा दिल्या जात आहेत. प्रोटीनयुक्त आहारापासून ते नॉनव्हेज पर्यंत जेवण दिले जाते. यामुळे सात ते आठ दिवसात या ठिकाणी रुग्ण बरा होतो आणि तो घरी जातो. दरम्यान जोपर्यंत कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत हे कोरोना केअर सेंटर निशुल्क स्वखर्चातून मी सुरूच ठेवणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अरविंद जाधव यांनी दिली आहे.
तर याविषयी कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे भागवत पवार म्हणाले, की मी पाटोदा येथून या ठिकाणी आलो आहे. इथं सुविधा चांगल्या दिल्या जात आहेत. दिवसातून तीन वेळा डॉक्टर राऊंड घेतात जास्त दुखत असेल तर त्याला लगेच मेडिसिन देतात. त्याचबरोबर जेवणाची आणि राहण्याची देखील चांगली सोय आहे. वातावरण देखील चांगलं असल्यामुळे या ठिकाणी मन देखील लागतं.
तर याविषयी दुसरे रुग्ण म्हणाले, की शासकीय रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नाहीत. व्यवस्थित लक्ष देत नाहीत, त्यामुळे आम्ही इथं आलो. इथं मला चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. जेवणासह इतर सुविधा देखील चांगली आहे. त्यामुळं आमच्या गावातून दहा-बारा जण याठिकाणी आलो आहोत.
तर याठिकाणी उपचार घेणाऱ्या महिला रुग्ण देखील, मिळणाऱ्या सुविधांमुळ समाधानी आहेत. सर्व सुविधा, जेवण व्यवस्थित दिला जात असल्यामुळे, या ठिकाणी कोणतीही अडचण आम्हाला निर्माण होत नाही. असंही त्या म्हणाल्या.
तर तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आम्ही सर्व तयरी केली असून मेडिसिन देखील उपलब्ध आहे. या घाटावरील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी अनेक अडचणी येतात. रुग्णवाहिका मिळत नाही. खाजगी रुग्णवाहिका अधिकचं भाडे घेतात. त्यामुळं इथंचं आणखीन चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. असं देखील जाधव यांनी सांगितलं.
दरम्यान बीड जिल्ह्यात एक ना अनेक लोकप्रतिनिधी आहेत.त्यातील अगदी बोटावर मोजण्या इतक्या प्रतिनिधींनी कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ही शासनाच्या निधी आणि जेवणाचे बिल घेऊन. मात्र शासनाचा एकही रुपयाचा निधी न घेता, जेवणाचे बिल न घेता, निशुल्क, स्वखर्चातून अरविंद जाधव हा तरुण कोविड सेंटर चालवत आहे. आणि जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत हे सेंटर सुरू ठेवलं जाईल. असा मानस अरविंद जाधव यांनी केला आहे. त्यामुळं अरविंद जाधव यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींपुढं आदर्श निर्माण केला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.