Talathi Bharati Paper Leak Nashik : राज्यातील विविध परिक्षांमध्ये गैरप्रकार आणि पेपर फुटीचे प्रकार काही थांबत नसल्याचे चित्रं दिसत आहे. नुकत्याच नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेत पहिल्याच दिवशी गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा कालपासून सुरू झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबइझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती.
या ठिकाणी हायटेक कॉपीचा प्रकार पोलीसांनी उघड केला. म्हसरूळ भागातील वेबइझी इन्फोटेक याठिकाणी पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या संशयिताला ताब्यात घेतले.
संशयिताची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल, हेडफोन, सूक्ष्म श्रवणयंत्र आणि एक टॅब असे साहित्य जप्त करण्यात आले. या संशयितांकडून ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांचे फोटो आढळून आले.
हा संशयित त्या परीक्षा केंद्रात कोणाला मदत करत होता आणि या बरोबर अजून कोणी सहभागी आहे का? याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून यामागे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.