नाशकातील बिबट्याला पकडण्यात यश, संपुर्ण थरार कॅमेरात कैद; पाहा Video

शहरातील एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत, एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्याच्या आवारात अतिशय चपळाईनं पळणाऱ्या बिबट्याने नाशिकमध्ये दहशत पसरवली होती.
Nashik Leopard
Nashik LeopardSaam TV
Published On

नाशिक: नाशिकमध्ये आज पुन्हा बिबट्याचा (Nashik Leopard) थरार पाहायला मिळाला. तब्बल 4 ते 5 तास बिबट्या पुढे आणि वनविभागाचं पथक मागे असा बिबट्याला पकडण्याचा सर्व थरार सुरू होता. यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये (Nashik) मात्र बिबट्याची दहशत पसरली होती. अखेर तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

शहरातील एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत, एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्याच्या आवारात अतिशय चपळाईनं पळणाऱ्या बिबट्याने नाशिकमध्ये दहशत पसरवली होती. अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या या रहिवाशी परिसरात आज तब्बल 5 ते 6 तास बिबट्याचा मुक्तसंचार आणि त्याला पकडण्याचा थरार सुरू होता.

भक्ष्याच्या शोधात शहरात आलेला बिबट्या परिसरातल्या एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत, बंगल्यांच्या आवारात, झाडाझुडुपांमध्ये लपण्यासाठी बिबट्या सैरभैर धावत होता. तर वनविभागाच्या पथकाचीही बिबट्याच्या मागावर त्याला पकडण्यासाठी धावाधाव सुरू होती. या परिसरात सैरावैरा पळत असणाऱ्या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक नागरिक देखील जखमी झाला. मात्र सुदैवानं बिबट्यानं लगेच तिथून पळून गेल्यानं मोठा अनर्थ टळला. तर एक महिलाही बिबट्याच्या हल्ल्यातून दैव बलवत्तर असल्यानं बचावली.

बिबट्या पुढे आणि वनविभागाचं पथक मागे असे तब्बल 5 ते 6 तास बिबट्या वनविभागाला हुलकावणी देत राहिला. त्यात बघ्यांचीही गर्दी झाल्यानं बिबट्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. मात्र अखेर बिबट्या थकून एका बंगल्याच्या आवारातील गाडीखाली लपून बसल्यानं बिबट्याला पकडणं वनविभागाला काहीसं सोपं झालं. वनविभागाने गाडीच्या चारही बाजूने जाळी टाकून बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केलं. आणि सर्वांनीचं सुटकेचा निःश्वास सोडला.

नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याच्या घटना

- 31 जानेवारी 2022 ( जय भवानी रोड, नाशिकरोड )

( 1 नागरिक जखमी )

- 18 एप्रिल 2021 (गंगापूर रोड)

- 12 सप्टेंबर 2021 (सामनगाव, नाशिकरोड)

- 17 फेब्रुवारी 2019 (गंगापूर रोड)

- 25 जानेवारी 2019 ( गंगापूर रोड )

( 1 नगरसेवक, 2 पत्रकार असे 3 जण जखमी )

जय भवानी रोड हा परिसर लष्करी हद्दीला लागून असून लष्करी क्षेत्रातलं जंगल, दाट झाडझुडपं, मैदानं, शेती, टोलेजंग इमारती, बंगले, गार्डन्स असा हा संपूर्ण परिसर आहे. रहिवाशी परिसर असल्यानं पाळीव प्राणी, मोकाट कुत्रे असं सहजासहजी मिळणारं भक्ष्य अशा कारणांमुळे या परिसरात नेहमीचं बिबट्याचं अस्तित्व आढळतं. याआधी अनेकदा या परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळलाय. सुदैवानं बिबट्या लवकर जेरबंद झाल्यानं सर्वांनीचं सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं नागरिकांची अधिक काळजी आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com