सातारा/सोलापूर : राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून काही भागात तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान काल सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाने तडाखा दिला असून शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. यात पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील दक्षिण कोरेगाव तालुक्यात साप, रहिमतपूर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. दक्षिण कोरेगाव तालुक्यातील नऊ महसूल मंडल विभागात मागील दोन दिवसात साप, वेळू, जयपूर, अंभेरी, अपशिंगे, रहिमतपूर, सुर्ली, तारगाव पडलेल्या पावसामुळे साप आणि रहिमतपूर महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामध्ये पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रहिमतपूर कराड मार्गावर सुर्ली राममळा येथील फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
बार्शी तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला काल रात्री मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे तालुक्यातील चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून चांदणी नदीला पूर आल्याने या गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबिन आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
विदर्भ- मराठवाडा जाणारा महामार्ग बंद
बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी झाली असून रात्री पाडून तालुक्यातील सर्व नद्या नाल्याना पूर आले आहेत. सोनोशी गावा जवळून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला महापूर आला असून विदर्भ- मराठवाडा जाणारा महामार्ग गेल्या ६ तासापासून बंद झाला आहे. नदीला पूर आल्याने गावात व शेतात पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, काही जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.