शिवसैनिकांनो घाबरु नका; दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ; दानवेंचं शिंदे गटाला आव्हान

'देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू इथले आमदार कोंबत होते. आता तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात.'
Eknath Shinde and ambadas danve
Eknath Shinde and ambadas danve Saam TV

बुलढाणा: शिवसैनिकांना गिनके आणि चुनके मारणारा अजून जन्माला यायचा आहे. या दादागिरीला दादागिरीनेच ऊत्तर दिले जाईल असं वक्तव्य शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं आहे. ते आज बुलढाणा येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यातील भाषणात बोलताना दानवे म्हणाले, या ठिकाणी कोणी मोजायला आलं आहे का? कुणीतरी येथे येऊन आधी गिनुन घ्या, एखाद्याला चूनुन घ्या, तोच कार्यकर्ता तुमच्याकडे पाठवतो, मग पाहतो कोण भारी ठरते ते असं आव्हानच दानवे यांनी शिंदे गटाला दिले.

पाहा व्हिडीओ -

ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू इथले आमदार कोंबत होते. आता तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात असा सवाल त्यांनी केला. सत्ता मिळविण्यासाठी, खुर्च्या मिळविण्यासाठी आम्ही शिवसेनेचं कामं केलं नाही. आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेनेचे काम करीत आहोत. सत्ता येत असते जात असते, कायमची खुर्ची घेऊन कुणी आलं नाही. आपल्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी राहिले नसले तरी त्यांना बनवणारे लोक मात्र आपल्यासोबत आहेत असही दानवे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा दिल्यानंतर माय माऊल्यांच्या डोळ्यात अश्रू होते. येणाऱ्या काळात या प्रत्येक अश्रूंची किंमत वसूल करायची आहे. कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्ष खराब करत आहे त्यांना आवरा, इथले आमदार नगरपालिकेत बसून अनधिकृत कामे करतात. बुलढाण्यात मटका उघड चालतो. बुलढाण्याच्या एसपी ऑफिसच्या बाजूला अवैध धंदे चालतात. पोलीस झोपले आहेत का? पोलीसांनो सत्ताधारी पक्षाच्या हाताखालच्या मांजर बनू नका.

बुलढाण्यात दादागिरी चालते पण शिवसैनिकांनो घाबरु नका, दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ, राज्यातच दहशतवाद आहे म्हणून बुलढाण्यात दहशतवाद आहे अशी टीका दानवे यांनी शिंदे गटावर यावेळी केली. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रातून पळवून लावण्यात येत आहेत असंही दानवे म्हणाले.

आता जसे गद्दार आहेत तसेच शिवरायांच्या स्वराज्यातही होते. मात्र निष्ठावान मावळे स्मरणात राहतात. योग्यवेळी ५० खोक्यांचे पुरावे समोर येतील. ज्यांनी दिले त्यांचेच लक्ष या खोक्यांवर आहे, तेच सांगतील. गद्दार आमदारांच्या डोक्यावरील गद्दारीचा टिळा पुसल्या जाणार नाही. बुलडाणा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाची तयारी करा, लोकसभेची तयारी करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बुलडाणा नगरपालिका माझीच, माझ्याच पोराची असे कुणी स्वप्न पाहू नका असा टोलाही त्यांनी स्थानिक विरोधकांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com