मुंबई : राज्यात 'शिंदे-फडणवीस' सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांसोबत शिवसेना भवनमध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्ष पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांना ठाकरे यांनी आदेश दिले. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याने शिवसेना नेमकी कुणाची ? हा प्रश्न राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून घिरट्या मारत आहे. अशातच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव अडसूळ यांच्या कठीण काळात शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. तसेच ईडीने केलेल्या कारवाई दरम्यान आणि आजारपणात शिवसेना नेतृत्वाने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत अडसूळ यांनी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. आनंदराव अडसूळ अमरावतीचे माजी खासदार आहेत.अडसूळ यांची सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. अडसुळ यांचा मुलाग अभिजीत अडसूळ हा आधीच शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळही शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.