सचिन बनसोडे
शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना काळापासून मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र भाविकांनी हि प्रतीक्षा आता संपली असून पुन्हा हार, प्रसाद नेता येणार असून याचा आजपासुन शुभारंभ करण्यात आला आहे.
शिर्डीच्या साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हि आनंदाची बातमी आहे. दरम्यान २०२० मध्ये जगात पसरलेल्या कोरोना महामारीने हाहाकार माजविला होता. कोरोना महामारीमुळे देशच नाही तर संपूर्ण जग थांबले होते. देशात लॉकडाऊन लावण्यात आल्याने सर्वच मंदिर देखील दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. मात्र कोरोना महामारी कमी झाल्यानंतर मंदिर हळूहळू दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.
मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर देखील साई मंदिरात भाविकांना केवळ दर्शन घेता येत होते. याठिकाणी फुल, हार किंवा प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. हि बंदी आजपर्यंत कायम होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदरची बंदी उठविण्यात आली असून आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे भाविकांची असलेली प्रतीक्षा आता थांबली आहे.
हार, प्रसाद स्टॉलचे उद्घाटन
साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीकडून ना नफा ना तोटा तत्त्वावर हार, फुल व प्रसादाची विक्री होणार आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील, साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी, साईसंस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि शिर्डीचे प्रमुख ग्रामस्थ यांच्या हस्ते फुल, हार प्रसादाच्या स्टॉलचे उद्घाटन केले. साई मंदिर दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारासमोर सोसायटीकडून स्टॉल लावण्यात आले आहेत. इतकेच नाही तर साई भक्तांसह परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांचा उदरनिर्वाह आणि परिवार फुल विक्री आणि उत्पादनाच्या माध्यमातून सुरू होता त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
साई संस्थान सोसायटीने स्टॉल लावले असून अत्यंत अल्प दरात हार, फुल व प्रसादाची विक्री होणार आहे. साई भक्तांची लूट होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच फुलांची विल्हेवाट लावण्याबाबत साई संस्थांनी निविदा प्रक्रिया काढलेली आहे. त्या सात दिवसात कुठलीही एजन्सी फुलांची विल्हेवाट लावण्या बाबत प्रस्ताव सादर करतील आणि न्यायालयाचा फुलांच्या विल्हेवाटी बाबत जो संभ्रम होता तो दूर केला जाईल.
साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून या फुलांची विक्री व्हावी असे निर्देश न्यायालयाने गठित केलेल्या समितीने दिले आहेत. प्राथमिक स्तरावर फक्त हार, फुल विक्री ही सोसायटीच्या माध्यमातून केली जाणार आहे. हार, फुल, प्रसाद साई मंदिरात व्यवस्थितरित्या सुरू झाल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक व्यवसायिकाला आपल्या दुकानात दरपत्रक लावणे बंधनकारक असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.