रायगड: अलिबाग-रोहा रस्ता हा ठेकेदारांकडे टक्केवारी मागणी केल्याने रखडला असल्याचा आरोप शेकाप आमदार जयंत पाटील यांनी अलिबागच्या आमदारांवर नाव न घेता केला आहे. शिवसेना आमदार हे निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून स्वखर्चाने काम सुरू करणार होते. मात्र अडीच वर्षे झाले तरी रस्ता अजून रखडलेलाच आहे. हिंदुस्तानात स्वतः पैसे खर्च करून रस्ता बनविणारा अजून जन्माला आलेला नाही असा सणसणीत टोला सत्ताधारी आमदारावर जयंत पाटील यांनी लगावला आहे. (Shekap's road blockade agitation for Alibag-Roha road)
हे देखील पहा -
अलिबाग-रोहा रस्त्यासाठी आज शेकाप पुरोगामी युवक संघटनेमार्फत रस्ता रोको आंदोलन खानाव येथे करण्यात आले. शेकाप आमदार जयंत पाटील हे या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता हे रस्त्याबाबत आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदरे यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. लवकरच ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
अलिबाग-रोहा रस्ता गेली अनेक वर्षे हा खड्डेमय आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेऊन तो तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंजूर केला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा पराभव होऊन शिवसेनेचे महेंद्र दळवी आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी त्वरित रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अडीच वर्षे होऊनही काम अपूर्णच आहे. त्यामुळे आज शेकापतर्फे रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले गेले. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार महेंद्र दळवी याच्यावर टीकेची झोड उठवली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे रस्त्याबाबत ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पावित्रा शेकाप कार्यकर्त्यांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी दोन दिवसांत रस्त्यावर पडलेले खड्डे भरून देणार असून वर्षभरात तीन लेअर रस्ता सुडकोली पर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, संदीप घरत, अनिल पाटील, नगरसेवक, सरपंच, सदस्य यासह शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे दोन तास वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. आंदोलनामुळे पोलिसांचाही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.