Sharad Pawar Rally In Nashik: अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहे.
आज शरद पवार (Sharad Pawar) यांची छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांची ही पहिलीच सभा असून दुपारी ४ वाजता येवला बाजार समितीच्या पटांगणात या सभेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शरद पवार या सभेत ते काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीतच राहत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. बंडानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षासह चिन्हावरही दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही संघर्षाचा पवित्रा घेतल्याने दोन्ही गट आमनेसामने भिडले आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी या बंडाचे आव्हान परतून लावण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात बंडखोर व कधीकाळी अती विश्वासू छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदार संघातून होणार आहे. छगन भुजबळांसह बडखोरांचा ते कसा समाचार घेतात, याकडे अजित पवार गटासह राज्याचे लक्ष लागले आहे.
विशेष बाब म्हणजे शरद पवार यांच्या सभेनंतर छगन भुजबळ देखील येवला येथे सभा घेणार असल्याची माहिती आहे. शरद पवार ज्या-ज्या मतदारसंघात सभा घेतील तिथे छगन भुजबळ देखील सभा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन दिग्गज नेते एकमेकांवर काय टीका करणार हेच पाहण महत्वाचं ठरणार आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.