सांगली, ता. २७ जुलै २०२४
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सततचा पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झाले असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून इंडियन आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे तसेच सैन्य दलाची 90 जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सांगली शहरामध्ये दाखल झाली आहे.
कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पाडणारा पाऊस आणि कोयना धरणातला विसर्ग,या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून पथकाला पाचारण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मिरज वाळवा शिराळा या भागातील सर्व शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून शहरात पुराचे पाणी शिरले आहे. कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच व्हीनस कॉर्नर परिसर, सीपीआर ते महावीर कॉलेज रोडवरील जयंती नाल्यावर पाणी आले असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी प्रयाग चिखली परिसरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा धोका असून अनेक गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. सध्या पंचगंगा नदी 47 फुटांवर वाहत असून जिल्ह्यातील 94 बंधारे पाण्याखाली गेलेत. जिल्ह्याला जोडणारे कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर गगनबावडा हे राज्य मार्ग बंद झाले असून जिल्हा अंतर्गत अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.