बंडखोर मंत्र्याला लागली म्हाडाची लॉटरी; औरंगाबादेत मिळालं नवं घर

मंत्री भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाचे घर लागले आहे.
Sandipan Bhumare
Sandipan BhumareSaam Tv
Published On

औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाने राजकीय भुकंप घडवून आणला आहे. शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. अशातच शिंदे यांच्या गटासोबत बंडखोरी करणारे पैठणचे आमदार तसेच रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागली आहे. औरंगाबाद येथे म्हाडाच्या चिकलाठाणा येथील घरासाठी शुक्रवारी (ता.२४) ऑनलाईन सोडत झाली. या सोडतीत मंत्री भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाचे घर लागले आहे. (Sandipan Bhumare Latest News)

Sandipan Bhumare
धर्मवीर 2 मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड दाखवणार का? निर्मात्यांनी दिलं 'हे' उत्तर

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करून मंत्री संदीपान भुमरे यांनी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणलं आहे. दुसरीकडे मात्र त्यांना आमदार कोट्यातून सरकारकडून घर घेण्याचा मोह आवरता आलेला नाही. त्यामुळे घराच्या निमित्ताने का होईना आता तरी संदीपान भुमरे औरंगाबादेत येणार का? अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.

शुक्रवारी म्हाडाची मराठवाड्यातील बाराशे सदनिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने सोडत घेण्यात आली. या सोडतीसाठी आठही जिल्ह्यातून सुमारे ११ हजारहून अधिक अर्ज आले होते. म्हाडातर्फे विविध गटासाठी काही सदनिका राखीव ठेवण्यात येतात. यातूनच राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेचे विद्यामान व माजी सदस्यांसाठी दोन टक्के सदनिका राखीव ठेवण्यात येतात. (Eknath Shinde Latest News)

Sandipan Bhumare
हे सर्व भाजपनेच केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल : उद्धव ठाकरे

यामध्ये आपल्यालाही आमदार कोट्यातून घर मिळावं यासाठी अल्प उत्पन्न गटातून (एलआयजी) चिकलठाणा येथील म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकासाठी मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज केला होता. आज या घरांची सोडत जाहीर झाली. यामध्ये एल-२,२,२०२ क्रमांकाचा प्लॉट भुमरे यांना लागला आहे. आमदार कोट्यातून एकच अर्ज आला होता. राज्यातील राजकीय उलथापालीत सहभागी झालेल्या भुमरे यांच्यासाठी ही एक प्रकारची लॉटरी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, संदीपान भुमरे यांना शिवसेनेकडून पैठण मतदार संघातून सलग पाच वेळा उमेदवारी देण्यात आली. एवढेच नव्हेतर महाविकास आघाडी सरकारमध्ये भुमरे यांना कॅबीनेट मंत्रीपदही देण्यात आले. एवढे होऊनही भुमरे यांनी बंडखोरी केली. संदीपान भुमरे हे अनेक वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. सध्या ते गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे सोबत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com