पुणे : कुख्यात गुंड संदीप मोहोळ (Sandip Mohol) प्रकरणाचा तब्बल १४ वर्षांनंतर विशेष मोक्का (MCOCA) कोर्टाने निकाल दिला असून या प्रकरणातील ३ आरोपींना जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असून या गुन्हयातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.
४ ऑक्टोबर २००६ रोजी पुण्यातील पौड फाटा परिसरात टोळीच्या वर्चस्व वादातून कुख्यात गुंड याची चारचाकी गाडीच्या काचा फोडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता व गुन्हे शाखेकडून १८ जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA), खून, आर्म ऍक्टसह भादंविच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे देखील पहा :
हत्येची पार्श्वभूमी :
कुख्यात मारणे टोळी (Marne Gang) व संदीप मोहोळ याच्या टोळीतील वर्चस्व वादातून संदीप मोहोळ याच्या टोळीतील गुंडांनी मारणे टोळीतल्या अनिल मारणे याचा २००५ मध्ये निर्घृण खून केला होता. याच खुनाचा बदला घेण्यासाठी मारणे टोळीतील गुंडांनी कट रचून संदीप मोहोळ याचा पौड फाटा परिसरात खून केला होता, हे पोलीस तपासातून स्पष्ट झाले होते.
संदीप मोहोळ खुनाचा खटला विशेष मोक्का न्यायालायापुढे ४ एप्रिल २००७ मध्ये दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी वकील म्हणून तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अॅड.उज्ज्वला पवार व अॅड.विलास पठारे यांनी काम पाहिले. तर बचाव पक्षातर्फे अॅड.सुरेशचंद्र भोसले, अॅड.चिन्मय भोसले, अॅड.हर्षद निंबाळकर, अॅड.राहुल वंजारी, अॅड.सुधीर शहा, अॅड.एन.डी.पवार, अॅड.अतुल पाटील, अॅड.सुदीप पासबोला, अॅड.धैर्यशील पाटील, अॅड.विपुल दुशिंग, अॅड.जितेंद्र सावंत, अॅड.राहुल भरेकर यांनी बाजू मांडली. या खटल्यामध्ये एकूण ७६ साक्षीदार तपासण्यात आले होते.
हेही वाचा :
यांची झाली निर्दोष मुक्तता :
सदर खून प्रकरणात १८ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी विजय कानगुडे, संजय कानगुडे, सचिन मारणे, गणेश मारणे, समीर शेख, रहीम शेख, अनिल खिलारे, राहुल तारू, शरद विटकर, दीपक मोकाशी, निलेश माझीरे, दत्तात्रय काळभोर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी इंद्रनील मिश्रा, दिनेश आवजी, पांडुरंग मोहोळ यांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला आहे.
By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.