Samruddhi Mahamarg Accident News : महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर नुकत्याच सिंदखेडराजाजवळ झालेल्या भीषण अपघातात २६ जणांचा बळी गेला. बस उलटल्यानंतर लागलेल्या आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर या महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातांची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. दुसरीकडे, हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये म्हणजेच सात महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या सात महिन्यांच्या कालावधीत १००० अपघात झाले आहेत. त्यात १०० पेक्षा अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. या कालावधीत कोणत्याही 'एक्स्प्रेस वे'वर झालेली ही सर्वात मोठी हानी आहे. (Latest Marathi News)
या अपघाताच्या घटनांनंतर राज्य सरकारनं अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत. मात्र, हे अपघात का होतात, काय असू शकतात यामागची कारणं? वाहनांची चाके या वेगासाठी सक्षम आहेत का? मानवी चूक की महामार्गाची रचना की आणखी काही?...तज्ज्ञांनी या अपघाताच्या घटनांमागील अनेक कारणे सांगितली आहेत.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांची आकडेवारी आणि या अपघातांमागील कारणे अहवालातून समोर आली आहेत. ११ डिसेंबर २०२२ ते २० मार्च २०२३ पर्यंतची ही आकडेवारी आहे. अतिवेगामुळे तांत्रिक बिघाड होऊन ४०० अपघात झाले आहेत. तर पंक्चर झाल्याने १३०, टायर फुटून १०८ अपघात झाले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, याच कारणांमुळे एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झालेत असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही.
महामार्गावरील ५१ अपघातांत (Accident) १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. वाहने चालवताना चालकांनी पुरेशी विश्रांती न घेणे हे एक कारण असू शकते. या महामार्गावर अद्याप कोणत्याही प्रकारचे थांबे निर्माण झालेले नाहीत. जेणेकरून वाहनचालकांना तिथे थांबता येईल आणि सलग होणारा प्रवास टाळता येईल अशी व्यवस्था अद्याप तरी नाही. याशिवाय डांबरी रस्त्यांवर वाहने ज्या पद्धतीने हाकली जातात, ती पद्धती क्राँक्रिटच्या सुपरहायवेवर उपयुक्त नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वास्तवात डांबरी रस्त्यांपेक्षा सीमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवरील वेग १० ते १५ टक्क्यांनी कमी असायला हवा, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
तज्ज्ञांनी सांगितले की, काँक्रिटचे रस्ते हे इतर रस्त्यांपेक्षा जास्त शाश्वत असतात. मात्र, क्राँक्रिटच्या मार्गावर लांबचा प्रवास करताना आपलं वाहन 'फिट' आहे का किंवा टायरमध्ये हवा (नायट्रोजन) पुरेशा प्रमाणात आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेगावरील नियंत्रण सुटणे, चालकाला डुलकी आणि टायर फुटणे ही अपघाताची तीन प्रमुख कारणे आहेत.
समृद्धी महामार्गावर डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत अनेक अपघात झाले आहेत. वाहनांच्या धडकेत साधारण २०० प्राणी ठार झाले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये बोरगाव गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत १४ रानडुकरांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी डिसेंबर २०२२ मध्ये वाहनांच्या धडकेत जवळपास ५० प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात हरीण, नीलगाय आणि माकडांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.