Delhi News: ठाण्यातील शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना (Samruddhi Highway Accident ) घडली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना अचानक पुलावरून गर्डर मशीनला जोडणारी क्रेन कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनं दु:ख झालं. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत. तर जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. एनडीआरफ आणि स्थानिक प्रशासनाकडून अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.'
या ट्विटमध्ये पीएम मोदींनी पुढे असे देखील सांगितले आहे की,'मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर, जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील.' दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूरनजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० कामगार, २ अभियंते आणि ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांवर ज्युपिटर रुग्णालय तर एकावर शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली आणखी ३ कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल १०० फूटांवरून खाली काम करत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेच्या ठिकाणी एकूण १७ कामगार आणि ९ इंजिनिअर काम करत होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशन दल आणि एनडीआरफच्या पथकाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटने मृत्यू झालेले बरेच मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.