छत्रपती संभाजीनगर : शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेत बनावट विद्यार्थी दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधील चार महाविद्यालयांनी ६ कोटी ५३ लाख रुपये लाटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी १७ जणांविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेत आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, शिक्षणापासून वंचित राहू नयेत; यासाठी अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व शेक्षणिक साहित्यासाठी आधार संलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात येते. मनपा हद्दीत प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी भोजनासाठी २८ हजार, निवास भत्ता १५ हजार, निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ५१ हजार रुपये दिले जातात.
आर्थिक फसवणूक केल्याचे उघड
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज, एपीजे अब्दुल कलाम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील लिपिक यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. चेतना शिक्षण संस्थेचे सावंगीतील कला महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयानेही गैरव्यवहार केला.
असे दाखविले बोगस विद्यार्थी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेजने २०२२ ते २०२५ या काळात ५४९ विद्यार्थी दाखवून २ कोटी ६९ लाख ६९ हजार ६५०, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजने २०२२ ते २०२५ या काळात ५३४ बोगस विद्यार्थी दाखवून २ कोटी ५८ लाख ८८ हजार ६५०, चेतना शिक्षण संस्थेच्या कला वरिष्ठ महाविद्यालयाने २०२२ ते २०२५ या काळात २८५ बोगस विद्यार्थी दाखवून १ कोटी १७ लाख ३१ हजार ६०० रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने २०२४ ते २०२५ या काळात ४८ बोगस विद्यार्थी दाखवून ७ लाख २६ हजार १५० रुपयांचा अपहार केला.
१७ जणांवर गुन्हा दाखल
फसवणूक करणाऱ्या आरोपींमध्ये प्राचार्य सय्यद अरशद अफसर, प्रभारी प्राचार्य खलील पठाण, लिपिक महेश रघुनाथ पाडळे, समीर शामीर पठाण, आदिवासी प्रकल्प कार्यालयातील लिपिक अविनाश मुटें, बनावट लाभार्थी, एजंट संदीप रामदास गवळे, परमेश्वर अशोक सोनवणे, राहुल नंदू साळवे, रवींद्र नंदू साळवे, कैलास श्रीपत गवळे, पल्लवी कैलास गवळे, महेश रघुनाथ पाडळे, स्वाती रघुनाथ पाडळे आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.