Laxmi Co Operative Bank : रिझर्व्ह बॅंकेने (Bank) रुपी पाठोपाठ आणखी महाराष्ट्रातील एका बॅंकेला मोठा दणका दिला आहे. RBI कडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तब्बल १०० वर्षे जुन्या असलेल्या या बॅंकेचे आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ९९ टक्के ठेवीदारांच्या ठेवी या विमा संरक्षित असल्याने त्यांना त्यांच्या ठेवी पूर्णपणे मिळणार असल्याचे ‘आरबीआय’ने म्हटले आहे. (Solapur News Today)
यापूर्वी रिझर्व्ह बँकेने (RBI) रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर आता लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्याने सोलापुरातील ठेवीदारांना चिंता लागली आहे.काही महिन्यांपूर्वी लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक अडचणीत आल्याने ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
ठेवीदारांचे पैसे परत मिळतील, असं आश्वासन बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आलं होतं. दरम्यान त्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आल्या. परंतू, ९४ हजार ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये अडकून पडल्या आहेत. दुसरीकडे बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने सध्याच्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या परिस्थितीत नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
बँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा करताना मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे की, बँकेने दिलेल्या तपशिलानुसार ९५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमार्फत दिल्या जातील. जर बँक बुडली, तर प्रत्येक ठेवीदाराला नवीन नियमांनुसार ठेव रकमेवर विमा दावा करण्याचा अधिकार असून, त्याची मर्यादा पाच लाखांपर्यंत आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. अनेक बँका या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. गेल्या वर्षभरात देशातील ६८ बँका बंद पडल्या आहेत, तर त्यापैकी ४२ बँका या दुसऱ्या लहान बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या. त्यात राज्यातील १४ बँक या पूर्णपणे बंद पडल्या असून ७ बँका या लहान बँक किंवा अन्य सक्षम बँकामध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.