- रश्मी पुराणिक
मुंबई : राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. हे प्रकरण अतिशय गांभीर्यपूर्ण पद्धतीने हाताळण्यात आले होते. यासाठी राज्याच्या विधानसभेत चर्चादेखील करण्यात आली. या चर्चेमध्ये गृहविभागाने आश्वासित केल्याप्रमाणे उच्चस्तरीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग (Phone Tapping) केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी माध्यमांना दिली. (Former Commissioner of Police Rashmi Shukla has been charged in illegal phone tapping case)
हे देखील पाहा :
या संदर्भात राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील पोलिस महासंचालकांना आणि आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रश्मी शुक्ला दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu), आशिष देशमुख (Ashish Deshmukh), संजय काकडे (Sanjay Kakade) तसेच इतर लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते. ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते त्यांचा संबंध ड्रग्ज अथवा तत्सम अमली व्यवसायाशी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
रश्मी शुक्ला या सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर कार्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. ही कारवाई सूड भावनेतून केली गेली का, अशा आशयाचा प्रश्न माध्यमांद्वारे विचारण्यात आला. असा सूडभावनेचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असे सांगत गृहमंत्र्यांनी या प्रश्नाचे खंडन केले.
मागील विधानसभा अधिवेशनात यावर चर्चा उपस्थित झाल्यामुळे चौकशी करण्यात आल्याचे ते म्हणाले. चौकशी अहवाल समोर आल्यानंतरही त्याची सखोल चौकशी केल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता चुकीच्या पद्धतीने कृती केली तरी त्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाते , असे गृहमंत्री म्हणाले.
देशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप (Phone Tapping) करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम १९८५ कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी तसेच परदेशी मित्रराष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे. परंतु यापैकी कोणतेही कारण नसताना रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेण्यात आली.
ज्यामध्ये नाना पटोले - अमजद खान, बच्चू कडू - निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे - तरबेज सुतार, आशिष देशमुख - रघु चोरगे अशाप्रकारची नावे देण्यात आली, अशी सविस्तर माहिती गृहमंत्र्यांनी दिली. सदर व्यक्ती कॉलेज विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकतात असा रिपोर्ट त्यांनी केला होता. त्याआधारे ही टॅपिंगची परवानगी मिळवली असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.