मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. तसेच मध्यरात्री निवडणुकीचा निकालही जाहीर करण्यात आला. या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपने (BJP) आपल्या तिन्ही जागा जिंकत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार धक्का दिला. निवडणुकीत विजय मिळवता यावा यासाठी महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच नेत्यांनी अथक प्रयत्न केले. मात्र, तरीही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. दरम्यान, या पराभवानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना देखील भाजपने अनेक मतं फोडून धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणले. राज्यसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडी सरकारला धोका असल्याचं बोललं जातं आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “आघाडीवर कोणताही परिणाम नाही. घोडेबाजारातील घोड्यांमुळे कोणताही परिणाम होत नाही. विशेषत महाराष्ट्रता घोडे तिकडे असतील इकडे असतील हरभरे टाकले की ते कुठेही जातात”, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
“मलाही पाडण्याचा डाव”
“मलाही पाडायचा डाव होता. पण ते शक्य होऊ शकलं नाही. मी फक्त माझ्यासाठी पक्षाने दिलेल्या 42 मतांवरच लढत होतो. त्यातील त्यांनी एक मत बाद करण्याचा प्रयत्न केला. मीही एकही जास्त मत घेतलं नाही. कारण आमच्यातही अटीतटीची लढत होती. मी काही 48-50 अशी मते घेतली नाही. मी फक्त 42 मतांवर लढलो आणि जिंकलो”, असंही राऊत म्हणालेत.
पहाटेच्या उपक्रमाला शुभेच्छा
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना राऊत म्हणाले, हे जे काही करण्यात आलं ते रात्री उशीरा ते हे सर्व पहाटेपर्यंत सुरू होतं. यांना पहाटेची फार सवय आहे पापकृत्य करण्याची. यांचा पहाटेपर्यंत जो उपक्रम सुरू होता, त्यांच्या त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा. तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा कायमचा एकदा घोडेबाजार करुन टाका असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
दगाबाजी केलेल्या आमदारांची यादी आमच्याकडे
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. काही जे घोडे जे बाजारातले होते ते विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं मला वाटतं. यामुळे अपक्षांची ६-७ मतं आम्हाला मिळाली नाही. ते (अपक्ष) कुणाचेच नसतात. पण आमचे घटक पक्ष जे आहेत त्यातलं एकही मत फुटलं नाही. ती सगळी मतं आम्हाला मिळाली आहेत. फक्त बाजारात घोडे बाजारात जे लोक उभे होते त्यांची ६-७ मतं आम्हाला मिळू शकली नाही. ज्याने कुणी शब्द देऊनही दगाबाजी केली आहे, त्याची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहिती आहे कुणी आम्हाला मत दिलं नाही. पण ठिक आहे पाहूयात असा सूचक इशारा त्यांनी अपक्ष आमदारांना दिला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.