मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण सोडलं आहे. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण सोडल्यानंतर सर्वच राजकीय नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर X (ट्विटर) अकाउंटवरून प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून चिमटा काढला आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाले राज ठाकरे
"मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो, असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे त्यांनी मराठा तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी म्हटलं की, " आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे. त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे. आणि ती योग्यच आहे. या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे."
मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारावर राज ठाकरे आपली इच्छा व्यक्त करत म्हणाले, " गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा."
"सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.", X (ट्विटर) अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शेवटी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारने १० सप्टेंबर रोजी सर्वपक्षिय बैठक बोलावली होती. ही बैठक झाल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील काही संवाद कॅमेऱ्यात कैद झाला. त्यांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.