सैराटच्या प्रिन्सला पोलीस ठोकणार बेड्या? फसवणूक प्रकरणात नाव आले समोर

मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी पैशांची मागणी
Rahuri Police
Rahuri PoliceSaam Tv
Published On

अहमदनगर - मंत्रालयात नोकरीला लावून देण्याचे आमीष दाखवून राहुरीमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणाला लाखों रुपयांना गंडा घालणाऱ्या तसेच राजमुद्रेचा गैरवापर करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी (Police) मुसक्या आवळल्या आहेत. या फसवणुकीमध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे निष्पन झाले असून सैराट (Sairat) चित्रपटातील प्रिन्स म्हणजेच सूरज पवार याचा देखील सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यालाही पोलीस लवकरच ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश वाघडकर या सुशिक्षित तरुणाला ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव श्रीरंग कुलकर्णी असे सांगून आपण मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागातून बोलत असल्याचे सांगितले. पुढे तो व्यक्ती म्हणाला की, आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत.

तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर मिळेल त्यावेळी तीन लाख रुपये द्या. बेरोजगार असताना आयती संधी चालून आल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. ठरल्याप्रमाणे ४ सप्टेंबर २०२२ रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात वाघडकर याने संबंधिताला दोन लाख रुपये दिले.

हे देखील पाहा -

दरम्यान दोन दिवसानंतर त्या तोतया अधिकाऱ्याने वाघुडकर यांना फोन करून, तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येतो असे सांगितले. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी आरोपी तथा तोतया श्रीरंग कुलकर्णी याने विद्यापीठ येथे येणार असल्याचे सांगितल्याने वाघडकर हे देखील तेथे गेले. त्यांनी ठरल्याप्रमाणे उर्वरीत तीन लाख रुपये देखील सोबत नेले होते.

जेव्हा तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे तेथे भेटले तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली आहे असे लक्षात आल्याने वाघडकर यांनी रक्कम देण्याचे टाळले आणि राहुरी पोलिस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता लक्षात आले की, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसून, नाव बदलून फसवणूक करणारा तो व्यक्ती म्हणजे नाशिक येथील दत्तात्रय क्षिरसागर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Rahuri Police
Vedanta Foxconn : 'वेदांता'वरून शरद पवारांनी 'त्या' एकाच वाक्यात PM मोदी, CM शिंदेंवर साधला निशाणा

फसवणुकीची ही सर्व घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीला संबंधित ऑर्डर तसेच बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी खोटे शिक्के आणि अन्य कागदपत्रे बनवून देणारे संगमनेर येथील आकाश शिंदे आणि ओंकार तरटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सैराट चित्रपटात ज्याने आर्चीचा भाऊ म्हणजे प्रिंन्स म्हणून काम केले, तो प्रिन्स देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून आम्हांला कामासाठी हे शिक्के लागतात असे सांगून शिक्के बनवून घेतल्याचा जबाब आरोपींनी पोलिसांना दिला आहे. या गुन्ह्यात भारतीय राजमुद्रेचा देखील गौरवापर केल्याने देशद्रोहासारखे कृत्य घडले आहे. त्यामुळे राहुरी पोलीस लवकरच सैराटचा प्रिन्स म्हणजेच सेलिब्रेटी सुरज पवार याला देखील लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी सांगितले आहे.

याप्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? आरोपींनी आणखी कुणाची फसवणूक केली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com