सागर आव्हाड
पुणे : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यानुसार पुण्याच्या थेऊर येथे मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र पूर्वस्थितीला कारणीभूत ठरलेल्याना महसूल विभागाने दणका दिला आहे. या पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतीच्या पावसाने राज्यात जोरदार तडाखा दिला आहे. पुण्याच्या थेऊर परिसरात देखील जोरदार पावसाचा तडाखा बसल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यात १५ सप्टेंबरला थेऊर फाटा ते थेऊर रस्त्यावरील कांबळे वस्ती व रुकेवस्ती परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रसादराव पाटील यांनी थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ६३ मध्ये त्यांच्या क्षेत्रालगत संरक्षण मिल बांधल्याने ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे. यामुळे पाणी परिसरात पसरले होते.
परवानगी न घेता अनधिकृत प्लॉटिंग
याशिवाय थेऊर येथील गट नंबर १६३ व १६४ मध्ये दिलीप कुंजीर, दत्तात्रय चव्हाण, सुषमा थोरात यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता ओढ्याचे पात्र बुजवुन त्यावर अनाधिकृत प्लॉटींग केली आहे. तर गोविंद उत्तमचंदानी व राजेश उत्तमचंदानी या दोघांनी थेऊर येथील गट नंबर ६६३ मध्ये जमीन खरेदी केली होती. त्यांनी ओढ्याचे पात्र बुजवुन त्यावर अनाधिकृत प्लॉटींग केली आहे.
नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने पूरस्थिती
ओढे, नाले बुजवून नैसर्गिक स्त्रोत कायमस्वरूपी बंद केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामध्ये निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे रुकेवस्ती येथे मोठ्या प्रमाणात पुरपरिस्थीती निर्माण झाली होती. तर या पुरात शेत मालाचे व पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
अर्जुन नागनाथ स्वामी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून प्रसादराव दत्ताजीराव पाटील, दिलीप कुंजीर, दत्तात्रय महादेव चव्हाण, सुषमा महेश थोरात (सर्व रा. थेऊर ता. हवेली, जि. पुणे), गोविंद जिवन उत्तमचंदानी व राजेश जीवन उत्तमचंदानी (रा. सिस्का हाऊस, प्लॉट नं. 89 ते 91 लेन नंबर 4, स. नं. 232/1/2, एअरपोर्ट रोड, साकोर नगर, लोहगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.