भारतीय सैन्य दलात असलेल्या एका जवानाने राजस्थानमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. नवनाथ सोंड (वय 32) असं मृत जवानाचे नाव असून ते परभणीच्या पालम तालुक्यातील खोरस गावचे रहिवासी होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यांच्या निधनाने संपूर्ण पालम तालुक्यावर (Parbhani News) शोककळा पसरली आहे. नवनाथ यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. शुक्रवारी नवनाथ यांचे पार्थिव त्यांच्या मूळ पालम गावी आणण्यात येणार आहे.
नवनाथ यांनी अत्यंत जिद्दीने भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवली होती. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवले होते. तेव्हा कुटुंबाचा संपूर्ण भार आईवर आला. त्यात आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. मोजून दीड एकरवर शेती, आणि त्यावरच त्यांची उपजीविका होती. (Latest Marathi News)
मग आईने हाडाचे पाणी करून नवनाथ यांना शिकवले. त्यांनीही मोठ्या कष्टाने तयारी करून देश सेवेत जाण्याचा निर्धार केला. अत्यंत खडतर प्रवास करून ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. पुढे त्यांनी कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावला.
2011 साली ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू व काश्मीर आदी ठिकाणी सेवा बजावली होती. मात्र, राजस्थानमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक भाऊ, भावजय असा परिवार आहे. या घटनेमुळे सोंड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पालम तालुक्यावर शोककळा पसरली आहे. नवनाथ यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात येणार आहे.
Edited by - Satish Daud Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.