
परभणीमध्ये हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. परभणी हिंसाचार प्रकरणी ३५० पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ परभणीमधील व्यापारी एकवटले असून ते त्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. तर आजही शहरातील अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत बुधवारी बंदची हाक देण्यात आली होती. या बंददरम्यान ठिक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले होते. दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. शहरात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. दुचाकी, चारचाकी वाहनं, पोलिस व्हॅन यांची आंदोलकाकडून तोडफोड करण्यात आली होती.
परभणी हिंसाचाराप्रकरणी सर्व व्यापारी एकत्र आले आहेत. परभणीच्या हिंसाचाराला एसपी आणि कलेक्टर हे दोघे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांची बदली होईपर्यंत आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत शहरातील दुकाने सुरू करणार नाहीत अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतली. परभणी शहरातील सर्व व्यापारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र जमून हा निर्णय घेतला आहे. दुकाने आणि वाहनं नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, कोट्यवधीचे नुकसान झाले आहे ही भरपाई द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
परभणीत गुरूवारी झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडीचा व्यापारी महासंघाने निषेध केला. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी सोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना अपयश आल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांची बदली होत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत दुकाने न उघडण्याचा पावित्रा व्यापारी महासंघाने घेतला आहे.
मराठवाड्यात आज जालन्या यासह हिंगोलीमध्ये आंबेडकरवादी संघटनांकडून आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरवादी संघटनांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोलीत सकाळी १० वाजता उघडण्यात येणारी दुकाने १२ वाजेपर्यंत बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान आंदोलक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करत परभणीमधील आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी देखील केली होती.
हिंगोलीत भीमसैनिकांनी आंबेडकर पुतळा परिसरात आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोली बंदची हाक देण्यात आली होती. मात्र हिंगोली पोलिसांनी आंदोलन सुरू होण्याआधीच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे आंदोलक कार्यकर्ते संतप्त झाले होते. आमच्या निर्दोष कार्यकर्त्यांना आधी सोडून द्या त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊन असा पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांची सुटका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.