मराठा आणि OBC आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हार घालणार नाही, फेटा बांधणार नाही : मुंडे

आपल्या विरोधी पक्षातील कोणताही नेता उठतो आणि म्हणतो महाविकास आघाडी सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार. परंतु, आमचं लक्ष सरकार पडण्याकडे नसून जनहिताची कामे होण्याकडे आहे.
pankaja munde
pankaja mundeसाम टीव्ही

बीड : पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा यांची जन्मभूमी असणाऱ्या सावरगाव घाट येथे भगवानगडावरून दसरा मेळाव्यास संबोधित करताना, दसरा मेळावा हा भक्ती आणि शक्तीची परंपरा जपणारा मेळावा असल्याचे म्हटले आहे. यावेळी पंकजा म्हणाल्या, भगवान बाबांची भक्ती आणि लोकनेते गोपीनाथ मुंडेंची शक्ती याची हि परंपरा आहे. देशात हा सोहळा सर्वात मोठा असून असा सोहळा देशात कुठे नसेल. लोकांना दिशा देण्यासाठी हा सोहळा असल्याचे यावेळी पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा या भगवानगडावर हेलिकॉप्टर च्या माध्यमातून आल्या होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, कोणत्या नेत्यांची चमचेगिरी करण्यासाठी हेलिकॉप्टर मधून हि फुले उधळली नसून जनतेसाठी उधळली आहेत.

आपल्या भाषणादरम्यान पंकजा यांनी समोर बसलेल्या जनसमुदायाची नजर काढली. यावेळी त्या म्हणाल्या आई जशी मुलाची दृष्ट काढते तशी मी आज तुमची दृष्ट काढली आहे. आईच्या मायेने तुमच्यावरून पदर ओवाळून टाकला आहे. वेळप्रसंगी तुमच्यावर जीव ओवाळून टाकेल.

पंकजा मुंडे म्हणाल्या हा मेळावा होईल की नाही याची चर्चा होती, काहीजण म्हणत होते सत्ता नाही, मेळावा होणार नाही. मात्र, मुंडे साहेब सत्ता नसतानाही मेळावा घ्यायचे. त्यामुळे सत्तेत नसतानाही मला मेळावा घ्यायचाय, जनतेस ऊर्जा द्यायचीय. "आयुष्यात जे आपल्याला मिळाल नाही त्याच्यासाठी रडत न बसता जे काही आपल्याला मिळालं आहे, त्यात समाधान मानावं" असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

कोरोना काळात समर्पित भावनेनं काम केलं :

कोरोना काळात लोकांची बिकट अस्वस्था झाली होती. त्यावेळी मी जनतेत मिसळून काम केलं. लोकांसाठी कोविड हॉस्पिटल्स उपलब्ध केली. बेड्स उपलब्ध करून दिल्या, रेमिडिसीविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

१२ डिसेंबर रोजी गावागावात जाऊन ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार

कोरोना काळात तुमची काळजी होती म्हणून दौरे केले नाहीत. पण, कोरोना काळात मदत केली. आता १२ डिसेंबर ला गावागावात जाऊन संवाद साधणार असल्याचे पंकजा यांनी म्हटलं आहे.

सरकारने जाहीर केलेलं पॅकेज पुरेसे नाही :

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ,त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अधिकची मदत द्या, अशी मागणी पंकजा यांनी राज्यसरकारकडे कलेची आहे. दरम्यान, महाकविकास आघाडीवर टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असताना राज्याकडून शेतकऱयांना काहीही मदत मिळाली नाही. केवळ मोदींचे पैसे खात्यात येतायत, राज्य सरकारकडून मदत मिळाली नाही. नुसत्या घोषणा करून उपयोग नसून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.

pankaja munde
"महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेच वाघ होते, तुमच्या सारख्या हुजऱ्यांना शेपटाचीही उपमा देता येणार नाही"

मंत्रिपद भाड्याने दिले:

पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली असून, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद भाड्याने दिले असल्याचे त्या म्हणाल्या. जनतेच्या हिताचं काम करा, स्त्रियांचे प्रश्न खूप आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात बलात्कार होत आहेत. राज्यात कायदा आणि व्यवस्था आहे कि नाही? महिलांवर अत्याचार होत असतील तर सरकारला जाब विचारायचा नाही? महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हार घालणार नाही, OBC आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही :

मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न वेगवेगळे असून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. तसेच जनतेच्या हितासाठी, ओबीसी आणि मराठा समाजासाठी लढणार मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत हार घालणार नाही. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही. असा संकल्प त्यांनी केला.

तीन पक्षांचं सरकार एकमेकांना खुश करण्यात व्यस्त :

तीन पक्षांच्या सरकारमध्ये नेते एकमेकांना खुश करतायत. मात्र, जनतेचे नुकसान होत असल्याची टीका मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

स्वपक्षीयांना चिमटा; सरकार पडणार कि टिकणार :

यावेळी सरकार पडण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी भाजपमधील काही नेत्यांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढला. आपल्या पक्षातील काही मंडळी सारखेच राज्यातील ठाकरे सरकार पडण्याच्या चर्चा करतात. आपल्या विरोधी पक्षातील कोणताही नेता उठतो आणि म्हणतो महाविकास आघाडी सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार. परंतु, आमचं लक्ष सरकार पडण्याकडे नसून जनहिताची कामे होण्याकडे आहे. तुम्ही सरकार पडतंय अथवा पडत नाही यातून बाहेर पडणार आहे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

व्यसनमुक्तीचा संकल्प :

पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्याना तंबाखूचे व्यसन सोडा असे आवाहन केले. यावेळी त्या म्हणाल्या, बीडमधील गावागावात जाऊन तंबाखू पॉकेटची होळी करण्याचा संकल्प करा. तंबाखू खाणाऱ्यांनो संकल्प करा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करा. तंबाखूचे सेवन करू नका, आजचा संकल्प व्यसनमुक्तीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com