राजेश भोस्तेकर
रायगड : मुंबई, पुण्यात नोकरी, व्यवसाय करून एक एक पैसा जमा करून गावात टुमदार घर बांधली गेली. काहींच्या नव्या घराची कामे अद्याप सुरू आहेत. मात्र केवनाळे (Kevnale Gaon) दरड दुर्घटनेनंतर गावात नव्या घरांची बांधकामे (Construction) थांबली. दरडीची टांगती तलवार असल्याने नव्या घरात राहण्याची स्वप्ने भंगली. केवनाळे गावातील घरामध्ये आता भटक्या कुत्र्यांनी आपले ठाण मांडल्याचे दिसत आहे. (New crisis on Kevnale villagers after the landslides)
हे देखील पहा -
मात्र 22 जुलै रोजी अतिवृष्टीने केवनाळे गावावर दरड कोसळली आणि नव्या घराची स्वप्न ही अपूर्णच राहिली. या दुर्घटनेत केवनाळे गावातील पाच जण दरडीखाली गाडली गेली. घरे भुईसपाट झाली. केवनाळेतील काही ग्रामस्थांनी लाखो रुपये खर्च करून बांधत असलेली घरेही दरडीच्या छायेखाली आल्याने सुरू असलेली घराची कामे अर्धवट सोडली आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांना आता घरे असूनही दरडीच्या भीतीमुळे नातेवाईकाकडे जाऊन राहण्याची वेळ आली आहे.
हे देखील पहा-
पोलादपूर तालुक्यातील केवनाळे हे गाव डोंगराच्या कुशीत वसले आहे. साधारण 85 ते 90 कुटूंबाची वस्ती असलेले हसते खेळते हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आहे. गावातील अनेक तरुणमंडळी हे कामानिमित्त मुंबई, पुणे या शहरात आहेत. गावात जेष्ठ नागरिक राहत आहेत. 22 जुलै रोजी रात्री आठ वाजता अतिवृष्टीने केवनाळे डोंगराचा मातीचा मोठा ढिगारा हा कोसळून सात ते आठ घरे गाढली गेली. या दुर्घटनेत पाच जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. त्यामुळे सध्या गावात दरडीची भीती ही प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात बसली आहे.
केवनाळे गावात ज्याठिकाणी दरड कोसळली त्याच्या बाजूला युवराज दाभेकर, सुनील दाभेकर आणि इतर दोन जणांच्या नवीन घराची कामे सुरू आहेत. सुनील दाभेकर यानेही टुमदार असे घर बांधले असून गणपतीला घरात आपल्या कुटूंबासह प्रवेश करणार होता. मात्र दरड रुपी काळाने सुनील आणि त्याच्या पत्नीवर नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच घाला घातला. नव्या घरात आपल्या संसाराची रंगवलेली स्वप्ने ही सुनील दाभेकर याची अर्धवटच राहिली. तर दुसरीकडे युवराज दाभेकर याच्याही नव्या टुमदार घराचे काम सुरू आहे.
चिऱ्याचे घर बांधताना आतापर्यत अडीच लाख रुपये खर्च केला आहे. मात्र दरड दुर्घटना झाल्याने आता त्याच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पै पै जमवून गावात घर बांधण्याचे युवराज याचेही स्वप्न आता भंगले गेले आहे. गावात अजून काही जणांची घराची कामे सुरू आहेत. दरडीची भीती आता या ग्रामस्थांच्या मनात कायम बसल्याने नवीन घरे बांधून आम्ही त्यात राहण्यास जिवंत राहू का अशी भीतीही त्यांना सतावत आहे.
आपल्या गावी घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. गावी आल्यानंतर स्वतःच्या घरात राहता यावे म्हणून केवनाळेतील काही ग्रामस्थांनी नवे घरे बांधण्यास सुरुवात केली खरी पण दरडरुपी काळाने त्याच्या या स्वप्नांवर माती टाकली आहे. त्यामुळे आता सुरक्षित ठिकाणी घरे आम्हाला शासनाने द्यावीत अशी मागणी युवराज दाभेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थानीही केली आहे.
केवनाळे मध्ये घरात आता कुत्र्याचे वास्तव्य
केवनाळे दरड दुर्घटना घडल्यानंतर ग्रामस्थ हे भयभीत झाले आहेत. अद्यापही दरड कोसळण्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे. त्यामुळे साऱ्या गावातील ग्रामस्थ हे नानेघोळ या गावात राहत आहेत. काही जण आपल्या नातेवाईकांकडे गेले आहेत. त्यामुळे गावात सध्या निरव शांतता आहे. गावात सध्या कुत्र्याचे साम्राज्य निर्माण झाले असून घरातील माणसे सुरक्षित स्थळी गेल्याने घराच्या बाहेर कुत्री बसलेली पाहायला मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.