अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण गाजले होते. पारनेरचे नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रवेश दिला होता. त्यामुळे हे राजकारण पेटले होते. कोणीच कोणाच्या नेत्यांना पक्षात घ्यायचे नाही, असे ठरले होते. मात्र, या सुत्राला हरताळ फासला आहे. सर्वच पक्ष आपापला पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष वेधू लागले आहेत. शेवगावातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना शिवसेनेने आपल्या पक्षात ओढून घेतले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यापूर्वी घडलेल्या या पक्षांतराची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे भातकुडगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य रामभाऊ साळवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी मुंबई येथे शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या भातकुडगाव गटातून साळवे यांनी विजय मिळविला होता. तालुक्यातील चारपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य हे राष्ट्रवादीचे आहेत. माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे समर्थक आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राजश्री घुले यांच्या रूपाने शेवगाव तालुक्याकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साळवे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्याच्या इतर भागातील भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांमध्ये दादेगावचे सरपंच अशोक दारकुंडे, उपसरपंच अरुण दारकुंडे, विष्णू तुजारे, नागलवाडीचे ॲड. किरण जाधव, गोरक्ष खेडकर, मुंगी येथील नितीन घोरपडे, अशोक कांबळे, वाडगाव येथील लक्ष्मण गायकवाड, किसन डाके, विनोद घोरपडे, किशोर भारस्कर, संभाजी घोरपडे, शेखर मोहिते, सादिक शेख, अशोक शिंदे आदींनी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शेवगाव तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे, तालुका उपप्रमुख विठ्ठल घुले, मधुकर कराड, विभागप्रमुख देविदास चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.