अहमदनगर ः पूर्वीच्या प्रथेनुसार राज्यातील प्रमुख देवस्थाने महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांनी वाटून घेतली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार आमचे, असे गणित मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेसने साईसंस्थानवर आपला हक्क सांगितला. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी या देवस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार हाती घेतला.
जिल्ह्यात आपले स्थान आणखी बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात मात्र या पक्षाची तब्येत तोळामासा आहे. यानिमित्ताने ती सुधारता आली तर पहावी, हा कयासदेखील यामागे असावा.
यापूर्वीच्या भाजपप्रणीत विश्वस्त मंडळाने लोकहिताच्या उपक्रमांचे कारण दाखवून साईबाबांच्या तिजोरीतून तब्बल दीडशे कोटी रुपयेच बाहेर नेले. थोडक्यात काय, तर पूर्वीपासून साईसंस्थानचा वापर उघडपणे राजकीय हितासाठी केला जात आहे.
आता तसे होणारच नाही याची खात्री देता येणार नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे मोहरे एकापाठोपाठ एक गारद झाले. संख्याबळ दोनपर्यंत खाली आले. राष्ट्रवादीने पुन्हा उसळी मारीत आपले संख्याबळ सहापर्यंत वाढवीत आपले वर्चस्व सिद्ध केले. दक्षिणेतून आमदार रोहित पवार यांचा उदय झाला. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना, पुन्हा अहमदनगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्यात यश मिळाले. पाठोपाठ दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेनेची युती होऊन महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आले.
अहमदनगर जिल्ह्याकडे ज्येष्ठ नेते पवार यांचे पूर्वीपासून लक्ष आहे. येथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बारकावे त्यांना ठाऊक आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे या परंपरागत गटांची तुल्यबळ ताकद आहे. येथील प्रत्येक निवडणूक चुरशीची असते. हे अध्यक्षपद काळेंना देऊन त्यांना आणखी शक्ती देण्याचा प्रयत्न पक्षाने केला होता. यापूर्वी ज्येष्ठ नेते शंकराव कोल्हे यांना उपाध्यक्ष देऊन असाच प्रयत्न करण्यात आला होता. आता या निवडीचे दृश्य परिणाम काय होतील याचा विचार केला तर तोंडावर आलेल्या राहाता नगरपालिका आणि शिर्डी नगरपंचायत निवडणुका काहीशा रंगतदार होऊ शकतील.
भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे या विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. राहाता पालिकेत भाजपचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या पत्नी नगराध्यक्ष आहेत. येत्या निवडणुकीत विखे-पिपाडा असे संयुक्त मंडळ तयार होऊ शकते.
शिर्डीत मुळ भाजप आणि विखे गट यांचे मंडळ तयार होऊ शकते. नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे या मंडळींचेच तिसरे मंडळ उभे राहीले. आणि महाविकास आघाडीचे चौथे मंडळ तयार झाले. त्याला एका बाजूने आमदार आशुतोष काळे आणि दुसऱ्या बाजूने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रसद पुरवली तर या दोन्ही निवडणुका कमालीच्या रंगतदार होतील. आणि मग त्यापुढील प्रत्येक निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
साईसंस्थानचा कारभार फार मोठा आहे. संस्थानचे रूग्णालय गोरगरीब रुग्णांना वरदान ठरले आहे. शैक्षणिक व वैद्यकीय मदत करण्यासाठी त्यासारखे दुसरे राजकीय साधन नाही. त्याद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील तीनही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लोकांची कामे करण्याचे संधी मिळेल. एकूणच अनुक्रमे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व काही प्रमाणात कॉंग्रेस पक्षाला साईसंस्थानचा मोठा बारदाना आधार द्यायला कारणीभूत ठरेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.