तबरेज शेख, साम टीव्ही
Nashik News Today: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून खूनासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. एकीकडे पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या वादातून चुलत सासऱ्याने चुलत सुनेसोबत भयावह कृत्य केल्याचं उघड झालं आहे.
मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) जमिनीवरून झालेल्या वादाचा बदला सासऱ्याने नाशिकमध्ये हत्या करून घेतला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की नाशिकच्या सातपूर येथील विधाते मळा परिसरात परप्रांतीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणात सातपूर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते.
मात्र, पोलिसांनी (Police) चक्रे फिरवत काही तासाच्या आत संशयितांना अटक केली आहे. गावाकडील जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने चुलत सासऱ्यानेच आपल्या चुलत सुनेचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मूळच्या मध्य प्रदेश आणि सध्या सातपुर येथे राहणाऱ्या अशोक्तीबाई शनीदयाल बैगा या परप्रांतीय महिलेची सोमवारी सकाळी हत्या झाली होती.
सोमवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर अवघ्या काही तासातच अशोक्तीबाई ह्या रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या होत्या. तीनच दिवसांपूर्वी या परिसरात राहायला आलेल्या या बैग कुटुंबीयांबद्दल जास्त माहिती नसल्याने खुनाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान सातपूर (Nashik News) पोलिसांसमोर होते.
पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत काही संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी जयकुमार परसराम बैग याने खुनाची (Crime News) कबुली दिली. खून करण्यात आलेली महिला संशयित आरोपीची चुलत सून असून, गावाकडे त्यांचा जमिनीवरून वाद सुरू होता. गावाकडे भांडण करून नुकतेच बैग कुटुंब सातपूरला आले होते.
सोमवारी सकाळी संशयित आरोपी आपल्या चुलत सुनेला जमिनीच्या वादावरून विचारणा करण्यासाठी गेला असता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला जात रागाच्या भरात चुलत सासर्याने स्वयंपाक घरातील सुरीने चुलत सुनेचा गळा चिरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.