सागर निकवाडे
नंदुरबार : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भरड, थुवाणी आणि अठ्ठी ही तीन गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणाच्या अभावामुळे येथील सुमारे ३०० ते ४०० ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान शासकीय निधीची वाट न पाहता या ग्रामस्थांनी स्वतः वर्गणी जमा करत ६ किमीचा रस्ता तयार केला आहे.
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगर दऱ्यांमध्ये असून आदिवासी पाड्यांवर आजही सोयी सुविधा पोहचलेल्या नाहीत. प्रामुख्याने रस्ते, वीज आणि आरोग्याची समस्या जाणवत आहे. यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतो. ग्रामस्थांकडून मागणी करून देखील या भागात शासकीय यंत्रणा पोहचत नाही कि शासकीय निधी पोहचत नाही.
विद्यार्थ्यांना दररोज १५ किमीची पायपीट
गावांमध्ये पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज १५ किलोमीटरची पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि एकही हँडपंप उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही या गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. अंगणवाडी एका तात्पुरत्या कुडाच्या घरात भरते. या सर्व समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
रस्त्यासाठी केली वर्गणी जमा
शासकीय मदतीची वाट न पाहता, येथील ग्रामस्थांनी स्वतः वर्गणी जमा करून ६ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू केले आहे. नर्मदा विकास विभागाने केवळ काही प्रमाणात दगडगोटे पुरवले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा शासनाकडे समस्या मांडल्या. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही योजना या गावांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने या मूलभूत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. जेणेकरून ही गावेही विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.