सागर निकवाडे
नंदुरबार : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या तांत्रिक अडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे महिलांना हि प्रक्रिया पूर्ण करताना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. योजनेची अधिकृत वेबसाइट सतत बंद होत असल्यामुळे आणि ओटीपी येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना ई- केवायसी करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
साधारण दीड- दोन वर्षांपासून राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दार महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात पडत आहेत. तर काही महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आले आहेत. मात्र आता योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड वापरून ई- केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे सर्व महिला ई- केवायसी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
एरर व ओटीपी येत नसल्याची अडचण
मात्र, लाभार्थी महिला वेबसाइटवर आधार क्रमांक टाकतात; त्यावेळी यावर 'एरर' दाखवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे पुढील प्रक्रिया थांबते. याशिवाय ज्या काही महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येत नसल्याची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबून अर्ज अपूर्ण राहत आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाहीयेत, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.
तासंतास सायबर कॅफेवर बसून
तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोठा फटका बसत आहे. अनेकजणी सायबर कॅफेमध्ये जाऊन तासन्तास वाट पाहत आहेत. तरीही त्यांचे काम होत नाही. सरकारने या समस्येकडे त्वरित लक्ष घालून वेबसाइटवरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी लाभार्थी महिला आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. तांत्रिक अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.