माशांपासून चकली, शेव, लोणचे; स्‍थलांतरानंतर आदिवासींचा मत्स्य व्यवसायातुन रोजगार

माशांपासून चकली, शेव, लोणचे; स्‍थलांतरानंतर आदिवासींचा मत्स्य व्यवसायातुन रोजगार
Fishing business
Fishing business
Published On

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील खैरवे गाव धरणामुळे स्थलांतरित झाल्याने अनेक नागरिकांची जमीन देखील पाण्याखाली गेली. यामुळे गावातील नागरिकांना रोजगारासाठी बाहेर गावी जावे लागत असते. गावातील धरणग्रस्त नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा; या उद्देशाने मत्स्य व्यवसाय विभाग आणि आयसीएआरचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था वर्सोवा मुंबई यांच्या सहकाऱ्याने खैरवे गावातील नवजीवन मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना करून धरणात मत्स्य पालन व्यवसाय उभारून ताज्या मासळीवर प्रक्रिया उद्योग उभारून नागरिकांना रोजगार निर्मितीची वाटचाल सुरू आहे. (nandurbar-news-Chakli-shave-pickles-from-fish-Employment-of-tribals-in-fishing-business)

आदिवासी बहुल आकांक्षित नंदुरबार जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विभागाच्या प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि मदतीने विविध नदी, शेततळे, बंधारे आणि तलावातून आधुनिक पद्धतीने मत्स्य पालन व्यवसायाने चांगला रोजगार प्राप्त होत आहे. मात्र काहीवेळा माशांचे जास्त उत्पादन झाल्यास नाशवंत माशांना योग्य बाजारपेठ नसल्याने मत्स्य व्यावसायिकांना नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळेस माशापासून बनविलेल्या दीर्घकाळ टिकणाऱ्या मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करून त्याचा व्यवसाय केल्याने मत्स्य व्यावसायिकांना कायमस्वरूपी नफ्याचा व्यवसाय करणे शक्य होणार आहे. हे पाहून मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करण्याबाबत मत्स्य व्यावसायिकांना प्रोत्साहित केले जात आहे.

Fishing business
छेडखानी केली नंतर चौकात बोलावून तरुणींनाच केली मारहाण

मत्स्य पदार्थ तयार करण्यासाठी सरसावले

नंदुरबार जिल्ह्यातल्या नावापुर तालुक्यातील खैरवे या संपूर्ण आदिवासी पुनर्वसित गावात मूल्यवर्धीत मत्स्य पदार्थ तयार करण्याचा पायलेट प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभाग आणि आय.सी.ए.आर.चे केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था वर्सोवा मुंबई यांच्या सहकाऱ्याने खैरवे गावातील नवजीवन मच्छीमार सहकारी संस्थांसह महिला बचत गटातील महिलांनी पारंपरिक पद्धतीची कात टाकत मूल्यवर्धीत मत्स्य पदार्थ तयार करण्यासाठी सरसावले आहेत. मासळी ही नाशवंत असून, त्याची वेळीच प्रक्रिया केली तर मासळी ताजी राहून खराब होत नाही. ज्यावेळी मासळी मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. त्यावेळीच त्याची कमी दरात विक्री होते. त्यावेळी मासळीला मूल्यवर्धीत करून विविध पदार्थ बनविले तर या पदार्थाला उच्चतर दर प्राप्त होतो.

माशांपासून चकली, शेव, लोणचे

खैरवे गावात महिला माशांपासून चकली, शेव, लोणचे, विविध प्रकारच्या चटणी यांसारखे अनेक टिकाऊ पदार्थ बनवू लागल्या आहेत. बाजारपेठेत या पदार्थांची मागणी आहे. परिणामी मच्छीमार संस्था आणि महिला बचत गटांना कायमस्वरूपी नफा व रोजगार मिळणे शक्य होणार आहे. या संस्थांना विविध पदार्थ तयार करण्यासाठी साहित्य पुरवठा केला आहे. त्यात फ्रिज, डिपफ्रिज, स्टील टेबल, पाउच पॅकिंग मशीन, शेगडी, गॅस सिलेंडर, मासळी विक्रीसाठी सोलर फ्रिजसह फिरती लोटगाडी, आदी साहित्याचा समावेश आहे.

रोजगाराचे चांगले साधन

नवजीवन मच्छीमार सहकारी संस्थेच्या २१४ सदस्यांसह उन्नती महिला बचत गटातील महिलांना यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. मत्स्य विभागातील अधिकारी या संस्था आणि बचत गटातील महिलांना वेळोवेळी मार्गदर्शनही करीत असतात. हे प्रोजेक्ट यशस्वी होणार असून त्यातून स्थानिक आदिवासी मच्छीमार संस्थांना व बचत गटातील आदिवासी महिलांना रोजगाराचे एक चांगले माध्यम मिळणार आहे. शासनाची ही योजना आदिवासी गावातील मच्छीमार व्यावसायिकांसाठी व महिलांसाठी संजीवनी ठरणार आहे. या योजनेचे नंदुरबार जिल्ह्यातून स्वागत करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com