नागपूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा गड, बालेकिल्ला, होमपीच किंवा सारं काही. या मतदारसंघातील भाजपचे दिग्गज नेते देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करतात. नितीन गडकरी 2014 आणि 2019 या लोकसभेला विक्रमी मतांनी जिंकले. भाजपने तिसऱ्यांदा त्यांना तिकीट दिलंय. नितीन गडकरींची लोकप्रियता अफाट आहे. पण यावेळी ते विजयी घोडदौड कायम राखू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो. जातीय राजकारण हा इथल्या मतदारसंघात कायमच महत्त्वाचा विषय ठरला आहे. नागपूर लोकसभा मतदार संघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ मोडतात. ते कोणते? तर नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर!
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट दिलं नाही. त्यामुळे विदर्भातल्या अनेक जागांवर भाजपला चांगलाच फटका बसला, असं आकडेही सांगतात. पण मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये नागपुरात नेमकं काय घडलंय? त्याची आकडेवारी जाणून घेऊ.
नागपूर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 मध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली. 2014 मध्ये 5 लाख 86 हजार 857 मतं मिळवत तब्बल पावणे तीन लाखाच्या मार्जिनने गडकरी जिंकले. 2019 मध्ये 6,57,624 इतकी मतं गडकरींनी घेत सलग दुसऱ्यांदा लोकसभेत दणदणीत विजय मिळवला. २०१९ लाही गडकरींनी २ लाखांपेक्षा जास्तीची लीड घेतली.
नागपुरचा गड जिंकणं हे भाजपचं स्वप्न होतं. त्यामुळे 2014 ला भाजपने आपला हुकमी एक्का बाहेर काढला. भाजपचे लोकप्रिय नेते नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर 2019 भाजपकडून गडकरी पुन्हा उभे राहिले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नागपुरचा गड राखला. २०१९ मध्ये गडकरींनी काँग्रेस नेते नाना पटोलेंना लोकसभेत धूळ चारली होती.
पण लोकसभा निवडणुकांचा विचार करता 2014 आणि 2019 मध्ये नागपुरात कोणत्या पक्षाचा वोट शेअर किती होता, त्यावर एक नजर टाकुया.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 54.2 टक्के मतदान झालं. तर काँग्रेसला 27.9% इतकं मतदान मिळालं. 2019 च्या आकडेवारीत पाहिलं तर चित्र किंचीत वेगळं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 55.7 टक्के मतदान झालं तर काँग्रेसला 37.5 इतकं मतदान झालं.
2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी होते. जवळपास सारखीच मतं दोन्ही निवडणुकीत भाजपला मिळाली, पण काँग्रेसशी कम्पेअर केलं, तर २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी तब्बल १० टक्क्यांनी वाढल्याचं दिसतं.
आता नागपूर लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद किती होती ते जाणून घेूऊ.
2014 मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या सहापैकी सहा जागी भाजपची सत्ता होती. म्हणजेच सहाही मतदार संघात भाजपचे आमदार होते. पण 2019 मध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या. २०१९च्या लोकसभा निवडणुकांवेळी चित्र वेगळं होतं. तेव्हा नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार आमदार होते. तर नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ या दोन्ही संघात काँग्रेसने आपला आमदार निवडून आणला होता.
हे चित्र 14 आणि 19 ची विधानसभा निवडणूक होण्यानंतरचं आहे. पण आता 2024 मध्ये काय चित्र आहे? महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिल्यानंतर कोण नेमकं कोणत्या गटात आहे? कुणी बंडखोरी केलीय? ते पाहू.
२०२४ मध्ये सध्या तरी भाजपच नागपुरात वरचढ दिसतोय. सध्या नागपुरात २०१९ सारखीच परिस्थिती आहे. २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही भाजपचे ४ आमदार नागपूर लोकसभा मतदारसंघात आहे. तर दोन विधानसभा मतदार संघांवर काँग्रेसचा झेंडा फडकतोय.
विशेष म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचाही विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे नागपुरातील लोकसभा मतदारसंघ हा गडकरी आणि फडणवीस यांसारख्या दिग्गज भाजप नेत्यांचा विषय ठरतो. अशात नागपूर जिंकणं, हे या दोन्हीही नेत्यांना प्रतीष्ठेचं आहे, यात वाद नाहीच!
नागपुरातलं राजकारण रंगतदार का आहे, याला आताच्या घडीला अनेक कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे, नागपुरातलं जातीय समीकरण. नागपूरमध्ये ओबीसी, मुस्लिम आणि दलित मतं फारच गेमचेंजर ठरतात, असं जाणकार सांगतात.
अशातच गेले काही महिने गाजलेला आरक्षणाचा मुद्दाही यंदाच्या लोकसभेत नागपुरात कळीचा ठरतो. दुसरीकडे गेली दहा वर्ष ज्यांनी नागपूरचा भाजपचा किल्ला अबाधित ठेवला, त्या गडकरींना तिसऱ्यांदा तिकीटही मिळालंय. त्यामुळे नागपुरात ते हॅट्रीक मारु शकतील का? हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं.
अशातच महाविकास आघाडी आणि वंचित यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या सगळ्यात नागपुरातली लढत ही एकतर थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होण्याचीच शक्यता जास्त आहे. पण त्याच वंचितची भूमिका काय असणार, यावरही बरंच काही अवलंबून आहे असं दिसतं.
पक्ष आणि विचारधारेच्या पलिकडे गडकरींची राजकारणात सगळ्यांशीच मैत्री आणि चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गडकरींची ही शक्ती तोडण्यासाठी महाविकास आघाडी किंबहुना काँग्रेस कोणती युक्ती लढवणार हे पाहणं महत्वाचंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.