नांदेड : राज्यात महाविकास आघाडी सरकार (mva government) कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या कारभाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केलीय. एकनाथ शिंदे गटात (eknath shinde) शिवसेनेचे नगरसेवक, आजी-माजी आमदारांसह खासदारही सामील होत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे शिंदे गट आणि ठाकरे गट असा राजकीय संघर्ष पेटला असतानाच राजकीय नेत्यांच्या पोलीस सुरक्षेचा (Police Security) मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झेड प्लस सुरक्षेवरुनही राजकीय वर्तुळात टीका-टीप्पणी होत आहे. अशातच आता शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी पोलिसांना पत्र दिले आहे. शिवसैनिकाच्या घराला पोलीस सुरक्षा देण्याची गरज नाही. माझी पोलीस सुरक्षा काढून टाका, असं पत्र पाटील यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, शिवसैनिकाच्या घराला पोलीस सुरक्षा देण्याची गरज नाही.स्वतःच्या घराची सुरक्षा करण्यासाठी शिवसैनिक नेहमी समर्थ असतो.मला सुरक्षेची गरज नाही. अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्याची तयारी आहे. माझ्या राजकीय कारकीर्दमध्ये मी नेहमी सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. याच सर्वसामान्य जनतेच्या जोरावर नगरसेवक पदापासून ते भारताच्या सर्वोच्च सभागृहाचे मी खासदार म्हणून लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे.
खासदार पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या तुकाई निवासस्थानी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र पाटील यांनी पोलीस प्रशासनाने पुरविलेल्या बंदोबस्ताबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानत तुकाई निवासस्थानवरील पोलीस बंदोबस्त मागे घ्यावा, असे पोलीस अधिक्षकांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.