Nashik News: केंद्र सरकारने (Central Government) शुक्रवारी चलनामध्ये असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बंद (2000 Rs demonetize) करण्याचा मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. 'नोटाबंदीचा निर्णय धरसोडपणाचा आहे. सरकारने हा धरसोडपणा करण्यापूर्वी विचार करायला हवा होता.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. 'तज्ज्ञांना विचारुन नोटाबंदीचा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. कधीही गोष्ट आणायची आणि बंद करायची. असे काय सरकार चालतं का?', असा सवाल त्यांनी केला. 'अशाप्रकारचे प्रयोग थोडी होतात. हा नोटाबंदीचा निर्णय सरकारला परवडणारा नाही.', अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरेंनी यावेळी त्र्यंबकेश्वरच्या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणं योग्य नाही. त्र्यंबकेश्वरमधील निर्णय गावकऱ्यांनी घ्यावा. 100 वर्षे जुनी परंपरा मोडून काढू नये. चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला पाहिजे. पण जाणूनबुजून गोष्टी काढण्यात अर्थ नाही.'
तसंच, 'महाराष्ट्रात मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधीच दंगली होत नाही. पण गडकिल्ल्यावरील अनधिकृत दर्गे हटवले पाहिजे. अनधिकृत मशीदी पाडल्याच पाहिजे.' असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त करत मशीदीवरच्या लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले.
राज ठाकरेंनी पुढे सांगितले की, 'मी सध्या नाशिक दौऱ्यावर असून पक्ष संघटना बळकट करण्यावर जोर देणार आहे. आमच्या सत्ताकाळात नाशिकमध्ये बरीच कामं झाली. आमच्या काळात याठिकाणी जेवढी कामं झाली तेवढी कामं आधी नाही झाली आणि त्यानंतरही नाही झाली.' असे सांगत राज ठाकरे यांनी दत्तक घेतलेल्या शहरांचं काय झालं?, असा सवाल सरकारला केला आहे. तसंच, कर्नाटक निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना 'एखाद्या राज्यावर तुम्ही देशाचा आराखडा मांडू शकत नाही. वातावरण कसं बदलतं हे यापुढे पाहण्यासारखे असेल.', असे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.