Live Updates : नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या सोशल मीडिया अकांऊंटमध्ये बदल

शिवसेना पक्षाची राज्यभरात असेलेली सर्व कार्यालये शिंदे गट थोड्याच दिवसात ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
Eknath shinde Vs uddhav thackeray
Eknath shinde Vs uddhav thackeray Saam TV

नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या सोशल मीडिया अकांऊंटमध्ये बदल

शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर शिवसेनेकडून सोशल मीडियावर देखील बदल करण्यात आले आहे. शिवसेना या अधिकृत युट्यूब चॅनलचं नाव ठाकरे गटाने बददले आहे. याआधी फक्त शिवसेना Shiv Sena असं नाव होतं आता ते Shiv Sena UBT (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं करण्यात आलं आहे.

पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; दोन्ही गटांची जोरदार घोषणाबाजी

पुण्यात नवी पेठ येथे शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही गटातील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे तणावाचे वातावरण झाले. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी दोन्ही गट आले समोरासमोर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात असताना दोन गटात जोरदार राडा झाला आहे.

'मशालही हे काढून घेतील, पण...'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी आज इतिहासाची पुनरावृत्ती केली. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा जिपवर उभा राहून लोकांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीबाहेर ओपन जिपमधून शिवसैनिकांशी संवाद साधला.

'कपटी राजकारण सुरू आहे. शिवसेना नाव चोराला दिलं गेलं, पवित्र धनुष्यबाण चोरांना दिलं, आता मशालही हे काढून घेतील. परंतु शिवसेना संपवता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. असे कितीही चोर आणि त्यांचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर भगवा फडकवण्याची ताकद शिवसैनिकांत आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल गेला.

धनुष्यबाण जाऊ शकतो, पण निष्ठा नाही : उद्धव ठाकरे

केंद्रीय निवडणूक आयोगानाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने मातोश्रीजवळ शक्तीपदर्शन केलं. त्यावेळी ठाकरे यांनी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 'धनुष्यबाण जाऊ शकतो, पण निष्ठा नाही, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

यवतमाळमध्ये ठाकरे गट आक्रमक; राज्य-केंद्र आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ यवतमाळच्या आर्णीमध्ये जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे यांनी पंतप्रधान मोदी,मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस आणि निवडणूक आयोगाविरोधात रास्तारोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगांचा बॅनर नायट्रोजन फुगे बरोबर आकाशात सोडून जाहीर निषेध नोंदविला

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर..

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये बिंदू चौकात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी देण्यात आल्या.. यावेळी महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसैनिक भावना व्यक्त करताना म्हणत आहेत की, 'नरेंद्र मोदी आणि अमित शहाणी या देशांमध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे..या देशामध्ये सर्व यंत्रणा त्याच्या बाजूने काम करतात. पण या देशांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या कामांमध्ये कधी अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत त्या आज घडत आहेत'.

'एकनाथ शिंदे आणि त्याच्या 40 बगलबच्चे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीच्या समोर यावं त्यावेळेला त्याना बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय आहे..हे आम्ही दाखवून देऊ.. आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना समर्थन करतो आणि एकदा वाघ आमचा बाहेर पडला की या महाराष्ट्रामध्ये ही चिरडून जाणार आहेत, अशा ठाकरे गट समर्थक शिवसैनिक करत आहे.

उद्धव ठाकरेंना महाशिवरात्रीचा प्रसाद मिळाला, जो रामाचा नाही...; नवनीत राणा यांचं टीकास्त्र

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला काल धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना महाशिवरात्रीचा प्रसाद मिळाला आहे.जो रामाचा नाही, हनुमानाचा नाही, तो कोणत्या कामाचा नाही आणि धनुष्यबाण त्यांचा नाही अशी खरमरीत टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली.

एक व्यक्ती चुकीचा होता म्हणून बाकी सर्व लोक बाहेर निघाले. 12 खासदार 40 आमदार बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारी माणसं आहेत. ज्यांनी दिवस-रात्र सतरंज्या उचलून शिवसेना निर्माण केली ते सर्व लोक बाहेर पडले. बाळासाहेबांनी आधी सांगितलं होतं की मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातला कधीच होणार नाही.तो पक्षाचा व्यक्ती राहील मात्र उद्धव ठाकरे यांना सत्तेचे आणि खुर्चीची लालसा लागली होती त्यांनी पूर्ण विचारधारा सोडून दिली होती, अशी टीका सुद्धा नवनीत राणा यांनी केली व अखेर सत्याचा विजय झाला असे सुद्धा नवनीत राणा यांनी सांगितले.

“बाळासाहेबही आज खूश असतील.. ” शिंदे गटाचं अभिनंदन करताना मराठी अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.  यावर नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेल्या आरोहने ही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं त्याने कौतुक केलं आहे. पोस्ट शेअर करत आरोह म्हणतो, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभिनंदन... बाळासाहेब पण खुश असतील आज'. त्याच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रियाही यायला सुरुवात झाली आहे.

काळाराम मंदिरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केलाय. नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात शिंदे गटाचे नाशिकचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी दर्शन घेऊन श्री काळारामाची महाआरती केली. प्रभू श्री रामाच्या आशीर्वादानेच शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची नाशिकच्या शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे काळाराम मंदिरात शिवसैनिकांनी जय श्री राम घोषणा देत मंदिर परिसर दणाणून सोडला.

...तर ठाकरेंना नक्कीच न्याय मिळेल, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला विश्वास

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धवजी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल.

शपथपत्र न देणारे 'ते' खासदार कोण? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

ठाकरे गटाकडून आपल्या बाजूने लोकसभेत ६ खासदार असल्याचा दावा केला गेला आहे. पण प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्रं निवडणूक आयोगाला सादर झाली. शपथ पत्र न देणारे ते दोन खासदार कोण? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुंबईत ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

काल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय दिल्यानंतर मुंबईत काही ठिकाणी शिवसैनिकांकडून बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना भवनाखाली देखील एक बॅनर लावण्यात आला आहे. 'निर्णय काहीही असो आम्ही शिवसैनिक कायम मातोश्री आणि ठाकरे परिवारासोबत एकनिष्ठ असणार, अशा आशयाचा बॅनर सेनाभवनाखाली लावण्यात आला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा;म्हणाले...

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसे नेते ट्विट करत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की स्वाभिमानासाठी आमदारकीवर लाथ मारणार ? असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच उभे राहतील आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाची हवा काढली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com