Samruddhi Mahamarg Bus Truck Accident: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची घटना ताजी असताना, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील २० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास छत्रपतीसंभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा खासगी बस प्रवास (Bus Accident) सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुराणा ट्रॅव्हल्सची खासगी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. बस छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी परिसरात आली असता, लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या कॅबिनचा चक्काचूर झाला.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील २० प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यातील ११ प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात तब्बल २५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याने समृद्धी महामार्गाबाबत मोठी टीका करण्यात आली होती. या अपघातानंतर खासगी बसच्या प्रवास सुरक्षतेविषयी प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. एकीकडे विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे खुराणा ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.