सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करत असतो. अशात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २१४ गुण मिळाले आहेत. यावरून अनेकांनी हल्लाबोल करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. सुरू असलेल्या गोंधळामुळे तलाठी भरतीची ही परीक्षा रद्द होणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
काल तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात जी मुलीगी पहिली आहे तिला २१४ मार्क पडले आहेत. याच मुलीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये ५४ मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये फक्त १४ दिवसांचा गॅप असताना हे कसं शक्य आहे? असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
तलाठी भरतीच्या या परीक्षेत मोठा घोटाळा होणार हे आम्ही आधीच सांगितलं होतं. यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका केली आहे. यावेळी मोठी पेपर फुटी देखील झाली, गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र कसलाही तपास न करता पेपर घेण्यात आले आहेत. सरकारने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.
तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात शिवसेना ठाकरे गट आक्रमक
ही तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे.
तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले ? याचे उत्तर सरकारने द्यावे, असा प्रश्न कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत. हे चुकीचे असून सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा. ही सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून नव्याने तलाठी भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने केली आहे.
तलाठी परीक्षेत जास्त गुणाबाबत महसूल खात्याचं स्पष्टीकरण
तरुणीला जास्तीचे मार्क मिळाल्याने यावर महसूल खात्याने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ४८ विद्यार्थ्यांना २०० पैकी जास्त गुण मिळाले आहेत. यावर बोलताना काठिण्य पातळीमुळं गुणात वाढ किंवा घट झाल्याचा दावा महसूल खात्यानं आपल्या स्पष्टीकरणात केला आहे. सामान्यीकृत पद्धतीमुळं २०० पैकी जास्त गुण मिळाले आहेत, असं त्यांनी म्हटलंय. तलाठी भरतीची ही परीक्षा टीसीएसमार्फत राबवली होती.
तलाठी भरतीत घोटाळ्यांचे सत्र काही थांबेना!
तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एखाद्या परीक्षार्थी दुसऱ्या परीक्षेत नापास होतो. परंतु, तलाठी भरती परीक्षेत टॉपर होतो. तसेच काही परीक्षार्थ्यांना 200 गुणाच्या परीक्षेत 214 गुण मिळाले आहेत. असे प्रकार घडताना आपण वारंवार पाहतोय. सरकारी नोकरीच्या भरतीच्या बाबतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतल्या जातात. मात्र, तरीही घोटाळे काही केल्या थांबेना. परीक्षांमध्ये पेपर फुटी, गुणांची अदलाबदल करणे, याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे, असं आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता ही परीक्षा रद्दा होणार का अशी भीती देखील अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.