कोल्हापूरच्या राजकारणात विधानसभेआधी मोठ्या घडामोडी घडत असून महायुतीला एकामागून एक धक्के बसत आहेत. काल समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आज अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. तसंच समरजितसिंह घाटगे यांच्या मेळव्यालाही उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी महायुती सरकारचा लाडकी बहीण योजना लाभार्थी सोहळा कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. यो मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिदें आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र के. पी. पाटील आणि समरजितसिंह घाटगे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली होती. नुकताच ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्या पाठोपाठ त्यांचे मेहुणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांचीही पावले महाविकास आघाडीच्या दिशेने पडताना दिसत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीला लागोपाठ दोन धक्के बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर के. पी. आणि ए. वाय. या मेहुण्या-पाहुण्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, पण विधानसभेला ज्याचा आमदार त्याला मतदारसंघ हे सूत्र महायुतीत निश्चित झालं आणि ए. वाय. यांच्याबरोबरच के. पी. यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटापासून दोन हात लांब राहणं पसंत केलं आहे. त्यानंतर झालेल्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्यालाही ते अनुपस्थित होते. याउलट शरद पवार यांच्या दौऱ्यात त्यांचा वावर दिसत होता.
राधानगरी आणि कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीला हा मोठा झटका बसला आहे. या दोन्ही नेत्यांमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. समरजितसिंह घाटगे महाविकास आघाडीसोबत गेल्यामुळे हसन मुश्रीफांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून आता कोल्हापुरात महायुती बॅकपूटवर जाताना दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.