Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला, आता गृहखात्याचा तिढा?; पडद्यामागं काहीतरी घडतंय!

Devendra Fadnavis - Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर सध्यातरी मिळालं असलं तरी आता भाजप आणि शिवसेनेत गृहमंत्रिपदावरून तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
Devendra Fadnavis -Eknath Shinde
Devendra Fadnavis -Eknath Shindesaam tv
Published On

Maharashtra Politics : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एक पाऊल मागं घेतलं असल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. हा पेच सुटला असला तरी आता आणखी एक तिढा निर्माण झाला आहे. गृहमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविरामच दिला. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप श्रेष्ठी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगत, शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आणि ते पण देवेंद्र फडणवीसच होणार असं आतातरी जवळपास निश्चित झालं आहे. पण दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच काही केल्या सुटत नव्हता. विधानसभा निवडणूक ही महायुतीनं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढली होती. महायुतीचे प्रमुख नेते वेळोवेळी तेच ठामपणे सांगत होते. पण विधानसभा निवडणूक निकालानंतर सगळं चित्रच पालटलं. राजकीय समीकरणं बदलली. महायुतीच्या २३० जागा निवडून आल्या. तर भाजपला न भूतो... अशा १३२ जागांवर विजय मिळाला. त्यामुळं मुख्यमंत्री हा भाजपचा असेल, अशी चर्चा सुरू झाली. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवून हे यश मिळवलं असून, मुख्यमंत्री तेच व्हायला हवेत, असा आग्रह शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी धरला. आजही तो आग्रह कायम असला तरी, शिंदेंच्या माघारीनं भाजपचा मुख्यमंत्री होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं.

मुख्यमंत्रिपदावर दिल्लीत होणार शिक्कामोर्तब

महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आणि नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. महायुतीची आज, गुरुवारी दिल्लीत बैठक आहे. अमित शहा यांच्यासोबत ही बैठक असणार आहे. या बैठकीला महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते दिल्लीत पोहोचले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाकडे आणि मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार यावर अंतिम निर्णय होईल. त्यानंतर राज्याचं मंत्रिमंडळ कसे असेल, हे ठरवले जाणार आहे.

गृह खात्यावरून तिढा?

मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला गुंता सुटला असला तरी, आता अतिमहत्वाचं गृहखातं कुणाकडे, यावरून तिढा वाढला आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत गृहखातं कुणाकडे राहील, यावरून चढाओढ सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. फडणवीसांकडे गृहखातं होतं. ते आता शिंदेंना हवं आहे, अशी माहितीही सूत्रांकडून दिली जात आहे. पण भाजप गृहखातं सोडण्यास तयार नसून, शहांसोबत होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार झाले. राज्यातील महत्वाचं असं गृहखातं हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्याचवेळी अतिमहत्वाचं असं गृहखातं हे शिंदेंकडे हवं, अशी मागणी होऊ लागली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis -Eknath Shinde
Devendra Fadnavis : फडणवीस याआधीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते; भुजबळांना नेमकं काय म्हणायचंय?

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार?

मुख्यमंत्री भाजपचा झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेनेच्या शिंदेंकडे असेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारता आपल्याच पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याकडे ते देऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. सत्तेच्या बाहेर न जाता सत्तेत राहून सरकार चालवावे, अशी मागणी शिवसेनेच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले तर ते शिंदेंनी घ्यावे, असेही या नेत्यांनी सांगितल्याची चर्चा आहे. त्यावर एकनाथ शिंदेंनीही नेत्यांच्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.

Devendra Fadnavis -Eknath Shinde
Maharashtra Ministry : गृह खातं कुणाकडे? अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना कोणती खाती मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com