Ravindra Chavan: "कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि राज्याच्या मालमत्तेचे नुकसान करतो?"; रवींद्र चव्हाणांचा मनसेला संतप्त सवाल

Ravindra Chavan On MNS: सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.", अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSaam TV
Published On

Maharashtra Political News:

आधी महामार्गांवरील टोल आणि आता रस्त्यावरील खड्ड्यांवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या टोलनाका प्रकरणावरुन भाजपकडून पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करतो?, असा संतप्त सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रातून विचारला आहे. (Latest Marathi News)

रवींद्र चव्हाण पत्रात नेमकं काय म्हणालेत

"दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला तर विध्वंस होतो. याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.", अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि राज्याच्या मालमत्तेचे नुकसान करतो?

पत्रात पुढे रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं की, "जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देशानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे."

"मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे.", असा सल्ला रवींद्र चव्हाण यांनी मनसेला दिला आहे.

"या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे."

पुढे काश्मीरची अर्थव्यवस्था कशी बदलली याबाबत सांगतना चव्हाण यांनी म्हटलं की,"ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीरमधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था. त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे." रवींद्र चव्हाण यांच्या या पत्रावर मनसे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com