Maharashtra Police Bharti 2022 : पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती (Police Recruitment) प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे. राज्यात येत्या 15 जूनपासून पोलीस भरती (Maharashtra Police) प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. इतकंच नाही तर, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भविष्यात 15 हजार जागांसाठीचीही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचं वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Police Bharti Latest News)
मागील काही वर्षांपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया रडखडलेली आहे. त्यामुळे पोलीस भरती नेमकी कधी होणार? असा प्रश्न भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना पडला होता. विशेषत: ग्रामीण भागातील तरूण पोलीस भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट बघत होते. हीच बाब लक्षात घेता, राज्यात येत्या 15 जूनपासून विविध पदांसाठी सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
"काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?"
वळसे पाटील म्हणाले, "पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात आणखी 15 हजार पदे भरण्यात येणार आहे. त्याबाबतची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर 15 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यापुर्वी 15 जूनपासून राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल. त्यामध्ये विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येणार आहेत. गृहविभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे.''
कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदली नाही
दरम्यान, दुसरीकडे पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात येणार नाहीत. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. पोलिस उपअधिक्षक पदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यानुसार, बदल्यांसंदर्भात योग्य ती पारदर्शकता पाळण्यात येईल, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.