Devendra Fadnavis News: श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. संभाजी भिडे यांच्या विरोधात विरोधकांनी सभागृहात आक्रमक घेतली. त्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. 'संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही, सरकार योग्य ती कारवाई करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. (Latest Marathi News)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याचा इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य अनुचित आहे'.
'संभाजी भिडे किंवा इतर कोणीच असे वक्तव्य करू नये. वादग्रस्त वक्तव्यामुळे निश्चितपणे लोकांमध्ये संताप तयार होतो. लोक हे कधीच महात्मा गांधी यांच्या विरुद्ध बोललेलं कधीच सहन करणार नाही. राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.
'महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कुणाबद्दल आम्ही खपवून घेणार नाही. संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काही कारण नाही, असेही फडणवीस पुढे म्हणाले.
'ज्या पद्धतीने या वक्तव्यावर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहेत, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी गलिच्छ शब्दात बोलतात. त्याचाही निषेध काँग्रेसने केला पाहिजे. त्यावेळी मात्र ते मिंदे होतात. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले.