
भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात भाजपला 20 मंत्रीपद मिळाली. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, यांच्यासारख्या निष्ठावंतांना डावलण्यात आलंय. तर या मंत्रिमंडळात भाजपने 60 टक्के निष्ठावंत आणि 40 टक्के आयाराम गयारामांना संधी दिल्याचं चित्र आहे. पाहुयात इतर पक्षातून भजपात प्रवेश केलेल्या कोणत्या नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा प्रवास झाला आहे. विखे यांनी आघाडी सरकारमध्ये अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत. एवढंच नाही तर फडणवीस सरकार असताना २०१४ मध्ये विखे यांना काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून मंत्रिपद पटकावलं.
नवी मुंबईतील शिवसेनेचे दिग्गज नेते अशी ओळख असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजप असा प्रवास केलाय. गणेश नाईक यांनी १९९९ मध्ये शिवसेना सोडुन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश नाईकांना मंत्रीपदी संधी मिळाली नव्हती. त्यामागे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेला वाद कारणीभूत ठरल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता महायुती सरकारमध्ये गणेश नाईक यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
नितेश राणे यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी स्वाभिमान संघटना स्थापन करून युवकांचे संघटन करण्याचा प्रयत्न केला. तर 2019 मध्ये राणेंनी भाजपात प्रवेश केला. सध्या नितेश राणे आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात.
शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. 2004 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे आमदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केला.
जयकुमार गोरे यांनी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात एन्ट्री केली. 2009 मध्ये अपक्ष आमदार तर 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार बनले. त्यानंतर 2019 मध्ये जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
संजय सावकारे यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भुसावळचे आमदार म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये सावकारे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. तर आता पुन्हा एकदा संजय सावकारे हे मंत्री बनले आहेत.
युवक काँग्रेस मधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणारे पंकज भोयर 2014 मध्ये दत्ता मेघे यांच्यासोबत भाजपात दाखल झाले. त्यानंतर पंकज भोयर हे वर्ध्यातून सलग तीन वेळा आमदार आहेत. त्यामुळे पंकज भोयर यांच्या रूपाने तब्बल दहा वर्षानंतर वर्धा जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले.
मेघना बोर्डीकर यांनी काँग्रेस पक्षातून परभणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात एन्ट्री केली. पुढे मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे भाजपमध्ये गेले. त्यावेळी मेघना बोर्डीकर यासुद्धा भाजपमध्ये गेल्या. त्यानंतर भाजपमधून दोन वेळा आमदार बनलेल्या मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपदाची संधी मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.