Maharashtra Bandh : परभणी येथील घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह बीड, नांदेड, लातूर, यवतमाळमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून याला व्यापाऱ्यांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात नागरिक आक्रमक झाले आहेत. अंबाजोगाई- कळंब महामार्गावरील दिघोळ अंबा येथे महामार्ग आडवत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे.
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. तर पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने बीड जिल्ह्यात नागरिक आक्रमक झाले असून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार बंद पाडण्यात येत आहे. तर मुंबईमध्ये देखील परभणी घटनेचे पडसाद उमटत असून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
रास्ता रोकोने वाहतूक खोळंबली
परभणी येथील न्यायालयीन कोठडीत झालेले युवकाचे मृत्यू प्रकरण आणि बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ डिघोळ अंबा येथील गामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्या होत्या.
लातूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद
लातूर : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. तसेच पोलिसांच्या कस्टडीतील कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरात कडकडीत बंद पाडण्यात येत आहे. यावेळी शहरातील आंबेडकरी व संविधानवादी पक्ष-संघटनाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. शाळा, महाविद्यालय, व्यापारी संकुल बंद करत व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा देखील तैनात केला आहे.
नांदेड बंदला चांगला प्रतिसाद.
नांदेड : परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. नांदेडमध्ये देखील या बंदला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्यात देखील या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आर्णी बंद
यवतमाळ : परभणीच्या घटनच्या निषेधार्थ संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्याच मृत्यूच्या निषेधार्थ आर्णी येथील बाजारपेठ बंद आहे. तर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असून दंगल नियंत्रण पथक, राखीव पोलीस दल शहरात दाखल झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.