ओंकार कदम
माढा लोकसभा मतदार संघातील युतीमध्ये जोरदार रस्सी खेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा लोकसभा मतदार संघाचे खा.रणजित निंबाळकर यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रामराजेंचे बंधू सातारा जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी रामराजे स्वतः आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या \मधील वाद हा तसा जुनाच आहे. या आधी रामराजे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खा.शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.
परंतु अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडल्यानंतर रामराजेंनी अजित दादांचा हात हातात घेतला. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या या सरकारमध्ये रणजित निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर दोघेही एकाच छताखाली आले.परंतु दोघांमधला संघर्ष मात्र अजून ही तसाच आहे.
जिथं संधी मिळेल तिथे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे हेवी वेट नेते अमित शहा यांचे निकवर्तीय मानले जातात. दिल्लीत रणजित निंबाळकर यांचे मोठे वजन आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा रणजित निंबाळकर यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले होते. एवढंच काय तर देशातील पहिल्या १० काम करणाऱ्या खासदारांच्या यादीत रणजित निंबाळकर यांचे नाव घेऊन त्यांच्या कामाचा गौरव केला होता.
त्यामुळे माढामधून रणजित निंबाळकरच युतीचे उमेदवार असतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. परंतु आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवला आसून उमेदवार खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून न देता पर्यायी संजीव राजे नाईक निंबाळकर यांना दिल्लीला पाठवा असे आवाहन केल्याने माढ्यामध्ये युतीची धाकधूक वाढली आहे. यामुळे पुन्हा एकदा माढा येथील महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे फलटणमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाची झळ माढा लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कुठपर्यंत पोहचणार हे आता पहावे लागेल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र या विषयावर बोलत असताना सावध प्रतिक्रिया दिली आहे. पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होईपर्यंत कोणी कुठे दावा करु शकतं. सर्वांना वाटतं सर्व जागा लढावाव्यात.परंतु शेवट बोर्ड जो निर्णय घेईल तो निर्णय सर्वांना मान्य राहील. त्यामुळे आज मागणी करायला सर्वांना मुभा आहे. मात्र एकदा निर्णय झाला की त्याच्या पाठीशी उभं रहावं. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. असे सांगून निंबाळकर यांच्या वादावर बावनकुळे यांनी सध्या तरी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.