गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला नाशिक येथील रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ही बातमी ताजी असतानाच पुण्यामध्येही युवराज मोरे आणि मरियम शेख या हिंदू-मुस्लिम नवदांपत्याचा विवाह पार पडला. या दोन्ही घटनांवरून प्रेमाची ताकद ही अन्य कुठल्याही गोष्टींपेक्षा मोठी असते हे दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक आणि पुण्यामध्ये होणाऱ्या विवाहांना काही संघटना आणि समाजाने लव्ह जिहादचा रंग देत विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर नाशिकचा विवाह सोहळा जरी पार पडला असला तरी पुण्यातील लग्न सोहळा रद्द करण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे. या दोन्ही घटना ताज्या असताना युवराज मोरे आणि मरियम शेख या दाम्पत्याचा विवाह सोहळा काल कात्रज येथे पार पडला.
हे देखील पहा -
युवराज आणि मरियम एकाच ठिकाणी कामाला आहेत. वर्षभरापासून ते एकमेकांना ओळखतात, ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाचा प्रस्ताव दोघांनीही त्यांच्या घरच्यांसमोर मांडला. दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि घरच्यांचा होकार मिळवण्यात ते यशस्वी झाले.
पुणे आणि नाशिक मधील आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहादच्या नावाखाली कट्टर विचारांच्या लोकांनी घातलेले अडथळॆ आणि त्यामुळे घरच्यांवर आलेले दडपण अश्या गोष्टी आजूबाजूला असतानाही दोन्ही कुटुंबाच्या संमतीने पुण्यातील मारियम आणि युवराज आंतरधर्मीय विवाह थाटामाटात पार पडला.
या लग्नाला कुठल्या समाजाचा, नातलगांचा विरोध नाही ना काही कुठला धार्मिक दबाव . दोन्ही घरच्यांनी रीतसर बोलणी करून हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबानी एकच हिंदू पद्धतीने लग्नपत्रिका छापली. लग्न विधीवत विना अडथळा पारही पडले.
"मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी" असं बोललं जातं मात्र, तरीही अनेक अडथळे अशा आंतरजातीय विवाहांना येत असतात, मुलगी जर हिंदू धर्मातील असेल आणि मुलगा मुस्लिम धर्मातील असेल तर आवर्जून लव्ह जिहाद चा मुद्दा उकरुन काढला जातो तुलनेने मुलगी मुस्लिम धर्मातील आणि मुलगा हिंदू असेल तर मात्र कट्टरता वादी लव्ह जिहाद चा मुद्दा विसरतात, थोडक्यात काय तर हे कट्टरतावादी आपल्या सोयीने भूमिका बदलताना दिसत आहेत. असे मत 'राईट टू लव्ह' या सामाजिक संघटनेने व्यक्त केले आहे.
देशातील धार्मिक आणि जातीभेदाची दरी मिटवायची असेल तर मोठ्या प्रमाणात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह होणे ही काळाची गरज असल्याचे अनेक समाजधुरीणांनी व महापुरुषांनी वेळोवेळी सांगितले आहे. मरियम आणि युवराज यांच्यासह त्यांच्या घरच्यांनी घेतलेली भूमिका नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
Edited By : Ashwini Jadhav-Kedari
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.