Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण; अनेक मागण्यासांठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण; अनेक मागण्यासांठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

Samruddhi Mahamarg : प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० किमी आहे.
Published on

Samruddhi Highway : ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण आज दुपारी पार पडणार आहे. यासाठी हेलीकॉप्टरने येणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थेट समृद्धी महामार्गावर उतरणार आहेत. दोघेही कारने तीन किलोमीटरचा प्रवास करतील आणि त्यानंतर हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल.

उद्घाटनावर आंदोलनाचं सावट

समृद्धी महामार्गाच्या आजच्या उद्घाटनावर आंदोलनाचं सावट आहे. सिन्नर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनानं पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्घाटनावर बहिष्कार टाकण्यासह समृद्धीवरून धावणाऱ्या वाहनांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वहिवाट रस्त्यांची दुरुस्ती, शेतकऱ्यांना ये जा करणाऱ्यांसाठी महामार्गाच्या दुतर्फा १० फूट रुंदीचा रस्ता, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह सुरळीत करून शेतजमिनीचे नुकसान टाळावे, यासह अन्य मागण्या पूर्ण न झाल्यानं शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे वैशिष्ट्ये

दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र ११,१२ आणि १३ चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० किमी आहे. या टप्याच्या उद्‌घाटनानंतर ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे. (Latest News)

Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण; अनेक मागण्यासांठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार; कारच्या धडकेत नीलगाय थेट हवेत फेकली, ३ जण गंभीर जखमी

या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.

या टप्यात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एकूण ७ गावातून लांबी ११.१४१ किमी नाशिक जिल्ह्यातील एकूण ६८.०३६ किमी लांबी पैकी सिन्नर तालुक्यातील एकूण २६ गावातून ६०.९६९ किमी व इगतपूरी तालुक्यातील ५ गावातील ७.०६७ किमी लांबीचा समावेश आहे. त्यामध्ये पॅकेज - ११अंतर्गत कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पॅकेज - १२ अंतर्गत गोदे ता. सिन्नर, जि. नाशिक व पॅकेज- १३अंतर्गत एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेज, भरवीर, ता. इगतपूरी, जि. नाशिक या इंटरचेंजचा समावेश आहे.

Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण; अनेक मागण्यासांठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
Political News : लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना देखील हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार?

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २० २२ रोजी पार पडले. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १०तासांऐवजी फक्त पाच तासातच कापणे शक्य झाले आहे. पाच महिन्यांत लाखो वाहनधारकांनी समृध्दी महामार्गाचा वापर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com