लातुर जिल्ह्यातील (Latur District) औसा-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडवर आज पुन्हा एकदा बस आणि दुचाकीचा अपघात झाला असून यामध्ये बसने दुचाकीला पाठीमागून धडक देत एकाला चिरडले आहे. तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी येथील बस व दुचाकीच्या अपघातात पिता व पुत्राचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आणखी एक अपघात झाल्याने ग्रामर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शेषेराव वैद्य (वय ३५) असे अपघातात मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ते आपले वडील आप्पाराव वैद्य यांच्या सोबत पंढरपूरहून एमएच १३ एजी १०९१ या आपल्या दुचाकीहून दिवाळी सणासाठी चिंचोली काजळे (ता.औसा) या आपल्या गावी परतत होते. उजनी (ता. औसा) येथील मोडवर त्यांच्या दुचाकीला कवठेमहांकाळ- नांदेड या बसने (क्रमांक एम एच १४ टी ४६३५) पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये वडील अप्पाराव वैद्य हे जखमी झाले आणि त्यांचा मुलगा शेषेराव हा बसच्या पाठीमागील चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच मरण पावला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान महामार्गावर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होऊन महिना लोटला असून देखील महामार्ग प्रशासनाने वाहतुकीसाठी रस्ता खुला करुन देण्यास दिरंगाई केली आणि अपघात होऊन एक जीव गेल्यानंतर तीच वाहतुकीसाठी अडसर ठरणारी माती तासभरात हटविण्याची तत्परता महामार्ग प्रशासनाने दाखवल्याचे पाहायला मिळाले. हीच तत्परता आधीच दाखवली असती तर आज एक निष्पाप जीव वाचला असता. त्यामुळे आता तरी महामार्ग प्रशासन अपघात रोखण्यासाठी पावले उचलणार आहे का? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत.
Edited By: Pravinn Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.